विश्वस्तावर कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ चक्रीय उपोषण
सोलापूर : सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाकडून श्री नीलकंठ समाज संस्थेतील लाखोंच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत चौकशी होऊन कारवाई होत नसल्याच्या विरोधात श्री नीलकंठ समाज संस्थेचे विश्वस्त व काही सभासदांनी, धर्मादाय उपायुक्त यांच्या अकार्यक्षम कारभाराच्या विरोधात गुरुवारी, ०७ सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर चक्रीय उपोषणास प्रारंभ केलाय.
येथील श्री. नीलकंठ समाज संस्था, ए-८६५/सोलापूर या क्रमांकाने धर्मादाय उपायुक्त, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, सोलापूर विभाग सोलापूर यांच्याकडे नोंदणी झालेली संस्था आहे. संस्थेच्या विश्वस्तांनी न्यास मिळकतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा हिशोब प्रारंभ पासून ठेवला नसल्याची, चक्रीय उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांची तक्रार आहे.
न्यासाचे पूर्वीचे विश्वस्त मयत झाल्याने, सन २००५ मध्ये विश्वस्त राजाराम बोगयागारू व अॅड. अंबादास रायनी हे दोघे विश्वस्त म्हणूुन संस्थेचे काम पाहात आहेत. त्यात राजाराम बोगयागारु यांनी समाजकंठक लोकांशी संगनमत करून पूर्वीच्या विश्वस्तांप्रमाणेच रक्कमा परस्पर गोळा करुन समाजाला विश्वासात न घेता, त्या रक्कमेचा अपव्यय आणि गैरव्यवहार केला. त्या रक्कमेचा हिशोब विचारलेले अॅड. अंबादास रायणी व त्यांच्या गटातील समर्थकांविरुद्ध खोट्या केसेस करून त्रास देण्यास प्रारंभ केला.
न्यास मिळकतीची, न्यासाचे उत्पन्न, मंगल कार्यालयाचे उत्पन्न, मौल्यवान वस्तू, बँक खाते, त्यातील जमा रक्कमा, मुदत ठेवी व मंगल कार्यालय भाडे रक्कमेचा अपहार व अपव्यय झाला असून विश्वस्त राजाराम बोगयागारू यांनी घर खर्च, मौज मजा व राजकीय कार्यासाठी वापर करून सुमारे एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा गैरव्यवहार केला असल्याचा उपोषणकर्त्यांचा आरोप आहे.
सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाकडे २३, डिसेंबर २०२० पासून प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेल्या निरीक्षक चौकशा पूर्ण करून विश्वस्त राजाराम बोगयागारू यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, यासाठी हे चक्रीय उपोषण सुरू असल्याचे शिवाजी नारायण अबत्तीनी यांनी सांगितले.
त्यांच्या समवेत नरसिंग दुबय्या इराबत्ती, मल्लेशम यल्लप्पा रायनी, शंकर तुकाराम अल्लम, शेखर दुबय्या इराबत्ती, बालाजी इरय्या चिंता, बालाजी विठ्ठल माडा, श्रीनिवास पोशेट्टी कालवा आणि किरण रामचंद्र इराबत्ती यांच्यासह अन्य पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.