सोलापूर : गेल्या महिन्याभरापासून पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने खरीप पिकासह सोयाबीनला लागलेली फुले पावसाची वाट पाहत आचके देत गळून पडत आहेत. ज्यांची पिके केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत, त्यांच्या पोटात गोळा उठला आहे. ऐन श्रावण महिन्यात पावसाने ओढ दिली आहे. "कोसळणाऱ्या श्रावणधारा" हा शब्दप्रयोग यावर्षी पुस्तकातील कवितांपुरताच मर्यादित राहिला आहे, असल्याची खंत दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांवचे यशपाल वाडकर यांनी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं प्रातिनिधीक स्वरुपात व्यक्त केलीय.
यंदाच्या खरीप हंगामात, यावर्षी मान्सूनला जरा उशिराच सुरुवात झालीय. जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यातच खऱ्या अर्थाने सगळीकडे पेरण्या झाल्या. पुष्य नक्षत्रात अधून-मधून रिमझिम पाऊस पडत होता. त्यामुळे सुरुवातीच्या काळात सोयाबीन, तूर अशी पिके चांगली बहरली होती. परंतु पावसाने पाठ फिरवल्यानं त्यांनी दुपार धरलीय.
ज्या शेतकऱ्यांकडे विहीर आहे, तिथं पाण्याने तळ गाठलेली स्थिती 'जैसे थे' आहे, ज्यांच्याकडे विंधन विहीर आहे, ते जमेल तसे पाणी देत आहेत. वीज पुरवठ्यात 'लोडशेडिंग' हा शब्द बळीराजाच्या पाचवीला पूजलेला ! कधी तळपत्या उन्हात तर कधी किर्र अंधारात पिकं जगविण्याची शेतकरी राजाची धडपड सुरू आहे. हवामान विभागाचा पाऊस पडण्याचा अंदाज नेहमीप्रमाणे चुकीचा ठरतो, हा प्रत्येक आघात बळीराजा छाताडावर झेलतोय.
यंदा पावसाने सतत गैरहजेरी लावल्याने बळीराजाचं सर्वस्व असणारी शिवाराच्या शिवारं ऊन्हाच्या तीव्रतेने होरपळत आहेत. ही भीषण परिस्थिती आपल्या कॅमेऱ्यात कैद करुन बळीराजाची 'व्यथा' शासनापुढं ठेवण्यासाठी मातीशी नातं असणाऱ्या माध्यमांचे प्रतिनिधी शहरी हद्द ओलांडून गावोगावच्या वेशीत अन् शिवारातल्या बांधावर असलेला हवालदिल 'राजा' ची निसर्गापुढंची हतबलता समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करताना दिसत आहेत.
बळीराजाचा वसा अन् मातीत खपण्याचा वारसा पुढे चालवत असलेला वारसदार त्यांची ऋणीच आहे.
या बळीराजानं, हजारो रुपयांच्या बियाण्यांनी काळ्या आईची ओटी भरली, तितक्याच खर्चाच्या खतांनी तिचं मळवट भरलं, केवळ वरुण रुष्ट झाल्यामुळे त्याची अवस्था दयनीय झालीय. शेअर बाजार धाडकन कोसळल्यानंतर त्याची जागतिक स्तरावर बातमी होते, परंतु भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असणारी शेती ! या व्यवसायाचा शेअर कणा-कणाने तळाला जात आहे,हे मणा-मणाचे दुःख शेतकऱ्यांशिवाय इतर कोणाला दिसत असेल, या शक्यतेचीही वाणवा आहे.
जगाचा पोशिंदा म्हणवणाऱ्या शेतकऱ्याला या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आता सरकार दरबारी हात पसरावे लागणार आहेत, मदतीची याचना करावी लागणार आहे, पंचनाम्याची वाट पहावी लागणार आहे, डोळ्यात येणारी 'आसवं' पापण्यांना पाजत संभाव्य तुटपुंज्या अनुदानाकडे 'आस' लावून बघावं लागणार आहे.
गत वर्षीच्या अतिवृष्टीमुळे ज्यांचं नुकसान झालं, त्यापैकी काहींना अतिवृष्टीचं अनुदान सदऱ्याच्या खिशात पडलेलं नाही. त्यांना सुद्धा या दुष्काळी पंचनाम्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्यांच्या दुःखाला काही पारावारच नाही. अशा बाका प्रसंगी 'बळीराजा' पर्यंत आले, तेही धन्यचं !
'हे जगतनियंत्या परमेश्वरा, या कठीण परिस्थितीत टिकून राहण्यासाठी आता तूच आम्हाला सहाय्यभूत हो' अशी बळीराजाच्या वारसदाराची मनोमन असलेली 'आर्त' हाक शासनाच्याही कानीही पडो, बस्स इतकंच !
ही लिंक ओपन झाली तर बरेच, अन्यथा बळीराजाचं शल्य त्याच्या काळजात नेहमीप्रमाणं क्लोज राहील, हे मात्र खरे !!