सोलापूर : प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्रावणमास निमित्त ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांनी स्थापन केलेल्या ६८ लिंगाचे दर्शन घेण्यासाठी ६८ लिंग भक्त मंडळ आणि वीरशैव व्हिजन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, 3 सप्टेंबर रोजी पदयात्रेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ६८ लिंग भक्त मंडळाचे अध्यक्ष शिवानंद सावळगी यांनी दिली.
श्रावण महिन्यात शहर परिसरातील ६८ लिंगाचे दर्शन घेतल्याने १२ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याचे पुण्य लाभते, अशी सोलापूरकरांची श्रद्धा आहे. ही पदयात्रा १९७५ साली संस्थापक कै.उमाकांत सावळगी यांनी कै.शरणप्पा मुद्देबिहाळ, संगप्पा बुरकुले, पावडप्पा भुशेट्टी यांना सोबत घेऊन सुरु केली. सध्या बसवराज सावळगी यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा काढण्यात येते. यंदाचे पदयात्रेचे ४८ वे वर्ष आहे. रविवारी, ०३ सप्टेंबर रोजी सकाळी ०६ वा. श्री सिद्धेश्वर मंदिर येथून पदयात्रेला प्रारंभ होणार असून बाळीवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिर येथे पदयात्रेचा समारोप होणार आहे.
या पदयात्रेत शहराबरोबरच दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट येथून सुमारे ५०० भाविक सहभागी होतात. या पदयात्रेची सुरुवात श्री सिद्धेश्वर मंदिर येथून होऊन डफरीन चौक, रेल्वे स्टेशन, जुनी मिल (उमा नगरी), बर्फ कारखाना, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पुणे नाका, सम्राट चौक, बाळीवेस, चाटी गल्ली, मीठ गल्ली, मधला मारुती, माणिक चौक समाचार चौक, पंचकट्टा, जिल्हा परिषद, होम मैदान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सुप्रजा पावभाजी, सुभाष चौक, चौपाड मार्गे बाळीवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिर येथे समारोप होणार आहे.
पदयात्रेच्या मध्यंतरात श्री शिवानुभव मंगल कार्यालय येथे दीपक भाऊ निकाळजे सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालीकोटी यांच्या वतीने तर पदयात्रा समारोपानंतर श्री मल्लिकार्जुन मंदिर मल्लेश पेद्दी यांच्या वतीने फराळ व चहा दिला जाणार आहे. ज्या भाविकांना पदयात्रेत सहभागी व्हायचे आहे, त्यांनी बसवराज सावळगी यांच्या ९३७३७४९९५५ या क्रमांकावर संपर्क साधावा आणि बहुसंख्येने पदयात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन वीरशैव व्हिजन उत्सव समितीचे अध्यक्ष चिदानंद मुस्तारे यांनी केले.
पत्रकार परिषदेस वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, कोषाध्यक्ष आनंद दुलंगे, सहकार्याध्यक्ष राजेश नीला, सोमनाथ चौधरी, सचिन विभूते उपस्थित होते.