सोलापूर : पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या कामगिरीत सराईत चोरट्यास गजाआड करण्यात यश आलंय. शिवप्रसाद राजू कंची असं त्याचे नांव आहे. त्यांने दुचाकी चोरी, घरफोडीसह ०६ गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्या ताब्यातून एक मोटारसायकल, ५० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि १३१५.३० ग्रॅम चांदीचे दागिने असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याचे सांगण्यात आलंय.
सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील मोटरसायकल चोरी, चोरी-घरफोडी यासारख्या विविध पोलीस ठाणेस दाखल गुन्हे उघडकीस आणण्यासंबंधी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी गुन्हे शाखेचे स.पो.नि. संदिप पाटील व त्यांचे पथकास सुचित केले होते. त्यांचे पथकास मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार शिवा कंची, (रा. नवीन विडी घरकुल, कुंभारी, सोलापूर) हा काळ्या रंगाची नंबर प्लेट नसलेली मोटार सायकल घेऊन चोरीचे दागिने विक्रीकरिता सोलापूर शहरात येणार असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार स.पो.नि. संदिप पाटील व त्यांचे पथकाने २६ ऑगस्ट रोजी एका संशयितास अटक करण्यात आलीय. त्याचे नांव शिवप्रसाद राजू कंची (वय- २३ वर्षे, गोदुताई विडी घरकुल, कुंभारी) असे असल्याचे सांगण्यात आले. व.पो.नि. सुनिल दोरगे यांचे मार्गदर्शनाखाली, स.पो.नि. संदिप पाटील व त्यांचे पथकाने कौशल्यपूर्ण तपास केला.
त्यात एमआयडीसी, विजापूर नाका, फौजदार चावडी व सदर बझार पोलीस ठाणे हद्दीत रात्री घरफोडी व चोरीचे गुन्हे केल्याचे कबूल केले. त्यात एकूण ०६ गुन्हे उघडकीस आणले. या वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये १ मोटार सायकल, एकूण ५० ग्रॅम सोन्याचे दागिने व १३१५.३० ग्रॅम चांदीचे दागिने असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय.
ही कामगिरी पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, पोलीस उप-आयुक्त अजित बोऱ्हाडे, गुन्हे (अति. कार्य.), सहायक पोलीस आयुक्त अजय परमार, गुन्हे (अति. कार्य.), वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल दोरगे (गुन्हे शाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. संदिप पाटील, पोलीस अंमलदार दिलीप किर्दक, विजयकुमार वाळके, विद्यासागर मोहिते, तात्यासाहेब पाटील, गणेश शिंदे, सुभाष मुंढे, शैलेश बुगड, प्रकाश गायकवाड, अविनाश पाटील, राठोड, सचिन होटकर, चालक सतिश काटे यांनी पार पाडली.