मराठा सेवा संघ हा शब्द वाचला की अनेकांना प्रश्न पडतो, ही नेमकी कसली संस्था आहे ? त्यांचे काम काय आहे ? त्याने समाजाला काय दिले ? त्यांच्या उत्तुंग कार्यातील अल्प माहितीसाठी हा थोडासा लेखनप्रपंच ...
शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा समाजाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या छोट्या-छोट्या समस्यांचं विचारमंथन व त्यावर मार्ग काढण्याचं विचारपीठ म्हणून मराठा सेवा संघाची स्थापना केली. कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविताना, आलेल्या अनुभवातून ही एक सामाजिक चळवळ म्हणून पुढं आली, हे सर्वज्ञातच आहे. निमूट असलेल्या युवकांना चालतं अन् बोलतं केले. त्यातून अनेक जण घडले. जे आजही बहुजन समाजाला आपले मित्र आणि शत्रूची स्पष्टपणे ओळख करून देत आहेत, हे पदोपदी दिसून येते.
१ सप्टेंबर १९९० सालापासून मराठा सेवा संघ ही पुरोगामी विचारधारेची ढाल आणि विकृतीवर आक्रमकपणे वार करणारी तलवार अशी ओळख धारण करणारी संस्था आहे. खरंतर मराठा सेवा संघाने नेमकं कोणतं कार्य केले हा प्रश्न महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना कधीही पडत नाही.
समाजा-समाजात धार्मिक तेढ आणि जातीय द्वेष पसरवणाऱ्या विघातक प्रवृत्तींनी सर्वसामान्य लोकांपर्यंत मराठा सेवा संघ आणि त्याचे वास्तविक विचार पोहोचू नयेत, म्हणून त्याविषयी जी बदनामीची मोहिम राबविली, जो अपप्रचार केला, जे चुकीचे चित्र समाजासमोर उभे केले. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना मराठा सेवा संघाचे उद्देश आणि कार्य याविषयी प्रश्न पडणे साहजिक आहे. मराठा सेवा संघाच्या कार्याविषयी थोडक्यात घेतलेला हा आढावा वाचून लोकांच्या माहितीत थोडी जरी भर पडली तर या लिखाणामागचा उद्देश साध्य झाला म्हणता येईल.
मराठा सेवा संघाने काय केले ?
“महाराष्ट्राच्या सामाजिक भूमीची नव्याने मशागत केली. समाजाला “जय जिजाऊ जय शिवराय”, “एक मराठा लाख मराठा” अशी आपुलकीची घोषवाक्ये दिली.
राष्ट्रमाता जिजाऊंच्या नावाला “जय जिजाऊ” असे अभिवादन मुल्य प्राप्त करुन देऊन लाखो लोकांना एकत्र आणले. पूर्वी राष्ट्रमाता जिजाऊंचे कोणतेही चित्र उपलब्ध नव्हते, त्यांचे तैलचित्र बनवून ते अधिकृत करुन राज्याच्या मंत्रालयात स्थापित करून घेतले.
विधानसभेत शिवजयंतीच्या तारखेच्या वादावर चर्चा घडवून १९ फेब्रुवारी ही शिवजयंतीची अधिकृत तारीख निश्चित करुन घेतली. १२ जानेवारी जिजाऊ जयंती सिंदखेडराजा,१९ फेब्रुवारी शिवजयंती किल्ले शिवनेरी, १४ मे शंभुजयंती किल्ले पुरंदर, ६ जुन शिवराज्याभिषेक किल्ले रायगड, हे उत्सव सुरु केले. २९ ऑगस्ट हा दिवस महाराष्ट्रात शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यासाठी शासनाकडे यशस्वी पाठपुरावा केला. पानिपतच्या युद्धातुन वाचलेले रोड मराठा आणि महाराष्ट्रातील मराठा बांधवांचा मराठा मिलन समारोह घडवून आणला.
धार्मिक, जातीय विद्वेषातुन दगडं उचलणाऱ्या युवकांच्या हातात वैचारिक पुस्तके दिली आणि महाराष्ट्रातील जातीय सलोखा वाढविला. इतिहासाच्या पुनर्लेखनाची चळवळ उभा करुन इतिहासाचे विकृतीकरण करणाऱ्यांवर दहशत बसविली. महापुरुषांचे विचार घराघरापर्यंत घेऊन जाणाऱ्या लेखक, वक्ते, शाहीर, कलाकारांची मोठी फळी निर्माण केली. लेखकांना वाचकवर्ग, वक्त्यांना श्रोतावर्ग, कलाकारांना प्रेक्षकवर्ग अन् महाराष्ट्राला वैचारिकवर्ग दिला. धार्मिक गोष्टींचा विचार करताना धर्माचा उदात्त विचार सांगणारी “शिवधर्म गाथा” दिली.
आपली नाणी, वाणी, लेखणी आणि करणी आपण आपल्याच लोकांविरोधात वापरु नये, ही आचारसंहिता दिली. युवकांना बुटाच्या पॉलिशपासून डोक्याच्या मालिशपर्यंत कोणताही व्यवसाय करण्याची दृष्टी दिली. समाजाला धर्मसत्ता, राजसत्ता, शिक्षणसत्ता, अर्थसत्ता, प्रचार-प्रसार, माध्यमसत्ता यांचे महत्व पटवून दिले. अज्ञान, अंधश्रद्धा, अहंकार आणि न्युनगंड ही समाजाच्या अधोगतीची कारणे आहेत, याची समाजाला जाणीव करुन दिली.
"समाजातील सांस्कृतिक दहशतवाद संपविण्यासाठी समाजाला सांस्कृतिक वारसा आणि बुद्ध-तुकोबा-शिव-फुले-शाहू-आंबेडकर ही साखळी समजावून सांगितली.”
मराठा सेवा संघाचे कार्य प्रत्यक्षात जितके दिसून येते, तितकेच अप्रत्यक्ष महाराष्ट्रातील सर्व समाज घटकांवर मराठा सेवा संघाच्या चळवळीचा प्रभाव पडला आहे.
आज माझ्यासारखे जे अनेक युवक वेगवगेळ्या विषयांवर निर्भीडपणे व्यक्त होतात, त्यासाठी मराठा सेवा संघाचा खूप मोठा आधार राहिलेला आहे.
मराठा सेवा संघाच्या ३३ व्या वर्धापनदिनाच्या सर्व सहकाऱ्यांना आणि समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा... !
सदाशिवराव पवार (सर)
अध्यक्ष - सोलापूर शहर,
मराठा सेवा संघ. सोलापूर.