सोलापूर : माहिती अधिकार कायदा हा लोकांना माहिती खुलेपणानं आणि पारदर्शकपणाने मिळावी, याकरिता हा कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे. ग्रंथालय चळवळ ही या कायद्याचं स्वागतच करते. नागरिकांना अर्ज येतात, खुल्या पणाने किती देऊन मदत करते. माहिती अधिकार या कायद्याचा वाचनालयाच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार करते, असे प्रतिपादन माहिती अधिकार कायद्याचे अभ्यासक व राज्य प्रशिक्षक प्रा. शिवाजीराव पवार यांनी बोलताना केले.
येथील हिराचंद नेमचंद वाचनालयामध्ये जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथालयाच्या जन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी यांच्या एक दिवसीय कार्यशाळेमध्ये प्रा. शिवाजीराव पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा ग्रंथालय संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार पवार होते.
या कार्यक्रमास जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव, ग्रंथालय निरीक्षक प्रमोद पाटील, संपतराव झळके, हिराचंद नेमचंद वाचनालयाचे कार्यवाह प्रा. डॉक्टर येळेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना प्रा. पवार पुढे म्हणाले की, माहिती अधिकार कायदा हा लोकांना गतिमान पद्धतीने माहिती मिळण्यासाठी आणि शासन कारभारात उत्तरदायित्व मिळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या कायद्याबद्दल समाजामध्ये जाणीव जागृती व्हावी, म्हणून ग्रंथालयाने भविष्य काळामध्ये काम करावे. माहिती खुलेपणाने नागरिकांना उपलब्ध करून द्यावी.
माहिती अधिकार कायद्याला आजपर्यंत १७ वर्षे पूर्ण झाली. महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा कायदा पोहोचण्यासाठी ग्रंथालय चळवळ मदत करेल आणि प्रामाणिक हेतू आणि योग्य माहिती मागणाऱ्या नागरिकांना त्वरित माहिती उपलब्ध करून दिली जाईल, अशी ग्वाही जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव यांनी बोलताना व्यक्त केली.
पूर्ण जिल्ह्यातून अनेक ग्रंथालयाचे जन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन ग्रंथालय निरीक्षक प्रमोद पाटील व प्रकल्प समन्वयक जयाजी देशमुख यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.