Type Here to Get Search Results !

'त्या' नोटीसची दुसरी वर्षपूर्ती ! मनपाचा इशारा जणू पोकळ धमकी !!

सोलापूर : पत्रा वॉलिंग करून छतास पत्रे टाकून रोलिंग शटर बसवून दुकान गाळे विनापरवाना बांधकाम केल्याप्रकरणी सोलापूर महानगरपालिकेने जी नोटीस बजावली आली होती. त्या नोटीसची २७ ऑगस्टला दुसरी वर्षपूर्ती होत आहे, दोन वर्षांनंतरही परिणाम शून्य आहे. त्यामुळे २४ तासात कारवाई करण्याचा मनपाचा इशारा जणू त्या नागरिकास पोकळ धमकी ठरल्याचे दिसून येत आहे. 
सोलापुरातील सात रस्ता परिसरात असलेल्या सुधाकर कॉम्प्लेक्स येथील इमारतीच्या मार्जिन स्पेसमध्ये विनापरवाना दोन गाळे उभे करून त्या जागेचा अनाधिकाराने वापर सुरू केल्याची सोलापूर महानगरपालिकडे तक्रार आल्यावर नगर रचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. तेथे विनापरवाना २ व्यावसायिक गाळे उभारल्याचे दिसून आले.

त्यावर महानगरपालिका नगर रचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी रविंद्र सुधाकर चौधरी  (रा. नं. ९४३, सुधाकर कॉम्लेक्स, सोलापूर) यांच्या नांवे २७ ऑगस्ट २०२१ रोजी नोटीस देऊन अवघ्या २४ तासात ते विनापरवाना उभारलेले गाळे काढून घ्यावेत, अन्यथा ते पत्रा वॉलिंग करून उभे केलेले गाळे भुईसपाट करून, त्यासाठी झालेला खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल, असा इशाराही त्या नोटीसीत देण्यात आला होता.

उपरोक्त बांधकामास यापूर्वी संदर्भान्वये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ५३ अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. तथापि सदर नोटीस ज्यांना बजावण्यात आली होती, त्यांनी त्या नोटिसीवर त्या क्षणापर्यंत कोणतीच कार्यवाही केलेली नाही, हेही त्या नोटीसीत उल्लेखण्यात आले होते.

अनाधिकृत/बेकायदेशीर २४ तासात काढून घ्यावे व बेकायदेशीर वापर बंद करावे, अन्यथा सदरचे अनाधिकृत/बेकायदेशीर बांधकाम महानगरपालिकेकडून यापुढे कोणतीही पुर्व सुचना न देता पाडण्यात येईल/नाहीसे करणेत येईल. सदरचे पाडकाम महानगरपालिकेकडून करतेवेळी जागेवर कोणतीही वित्तहानी झालेस सोलापूर महानगरपालिका जबाबदार राहणार नाही, तसेच सदरचा पाडकाम कामी होणारा खर्च आपणाकडून महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ मधील तरतुदीनुसार वसुल करण्यात येईल, असा त्या नोटीसीतील इशारा होता.

घर नं. ९४३, सुधाकर कॉम्लेक्स, येथील बांधकाम त्या नोटीसीच्या दुसऱ्या वर्षपूर्तीपर्यंत जैसे थे आहे. सोलापूर महानगरपालिकेने नोटीस बजावलेले अनधिकृत गाळे भुईसपाट करण्याचा आणि त्याचा खर्च वसूल करण्याचा दिलेला इशारा हा सोलापूर महानगरपालिकेने दिलेली पोकळ धमकी होती की काय असा सवाल आज सुजाण नागरिकांतून व्यक्त केला जातोय.