कासेगाव/प्रतिनिधी : दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक मंडलात विलंबाने झालेल्या खरीप हंगामातील पेरणीनंतर महिण्याभरात पावसाने दडी मारल्यामुळे सोयाबीन, उडीद, मूग, भुईमुग, तूर आणि बाजरी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. बळीराजाला या संकटात आधार देण्यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते महेश बिराजदार यांनी एका निवेदनाद्वारे करण्यात आलीय.
पाऊस लांबणीवर पडल्याने जनावरांना चारा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उग्र रूप धारण करीत आहे. कष्टकरी-शेतमजुरांना रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून त्वरीत काम सुरु करणे, खरीप हंगामात पावसाअभावी वाया गेलेल्या पिकांची पाहणी करून पिकांचे पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी, असे निवेदन दक्षिण सोलापूर तालुक्याचे तहसिलदार किरण जमदाडे यांच्याकडे देण्यात आलंय.
यावेळी धोत्री, दर्गनहळळीसह पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.