शालार्थ आय डी चा प्रश्न मार्गी लावा
सर्व संघटनाची सी इ ओ यांच्याकडे मागणी
कासेगाव : सोलापूर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाला प्रत्येक तालुक्यासाठी एक आणि शहरासाठी एक असे एकूण १२लिपिक द्या आणि जिल्ह्यातील २० टक्के अनुदानित शाळातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शालार्थ आय डी चा प्रश्न मार्गी लावा, अशी मागणी सोलापूर जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्याकडे सर्व संघटनाच्यावतीने समक्ष भेट घेऊन करण्यात आली.
नव्याने २० टक्के अनुदानावर आलेल्या शाळांना अनुदान निधी मंजूर होऊन पाच महिने होऊन गेले तरीही सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक व कर्मचाऱ्यांना शालार्थ आय डी अभावी वेतन मिळत नाही. शालार्थ आय डी चा प्रश्न त्वरित मार्गी लावण्यासाठी आदेश द्या, अशी विनंती यावेळी करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर, राज्य शाळा कृती समितीचे जिल्हा अध्यक्ष गुरुनाथ वांगीकर, मुख्याध्यापक संघाचे प्राचार्य शंकर वडणे, राज्य शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजकुमार बामनगे यांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. शालार्थ आय डी संदर्भात तात्काळ निर्णय घेण्याचे आदेश देण्यात येतील, असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले. त्यानंतर वरील पदाधिकारी यांनी अन्यायग्रस्त शेकडो शिक्षक व कर्मचारी यांना संबोधित केले.
यावेळी महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड, जिल्हा अध्यक्ष प्रा. युवराज भोसले, मोहोळ तालुका अध्यक्ष शिवाजी जगताप, शिक्षक व शिक्षकेतर संघटनेचे विभागीय अध्यक्ष बामेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सचिन गावडे, अशोक मोहरे, तेलंगे सर, पटेल सर, खंडागळे सर यांच्यासह शेकडो शिक्षक, शिक्षिका आणि कर्मचारी उपस्थित होते.