फायनान्स वसुली कर्मचाऱ्यांना मारहाण करून
जबरीने चोरून नेला जवळपास दोन लाखाचा ऐवज
सोलापूर : दुचाकीवर निघालेल्या दोन तरुणांना अज्ञात चोरट्यांनी मारहाण करून त्यांच्या जवळील जवळपास दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला. दिवसाढवळ्या झालेली जबरी चोरीची घटना सोलापूर विजापूर महामार्गावर असलेल्या डेंटल कॉलेजनजिकच्या ब्रिजजवळ बुधवारी सायंकाळी चार वा. च्या सुमारास घडली. त्या चोरट्यांनी बेसबॉल बॅट, हाताने बुक्क्यांनी तसेच दगडाने जबर मारहाण करून पैशाची बॅग, मोबाईल व टॅब असा ऐवज जबरीने चोरून नेला असल्याचे सांगण्यात आले.
याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, सनी गणेश शिक्का (वय- १९ वर्षे, रा- घनं १३८, रामलाल चाळ, सोलापूर) व त्याचा मित्र प्रशांत कांबळे असे दोघे मिळून त्यांचे भारत फायनान्सची कर्ज रक्कम वसुली करून एमआयडीसी चिंचोळी येथून घेऊन सोलापूर हायवेने देशमुख पाटील वस्तीकडे जात होते. त्यांना अज्ञात तिघा जणांनी ब्रिज जवळ रस्त्यात अडवून, मारहाण करून धाकाने त्यांच्याजवळील रोख रक्कम, मोबाईल, मोबाईल सिम कार्ड आणि सॅमसंग टॅब असा एकूण १,८१,००० रूपयांचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला.
दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने सामान्य जनता सुरक्षित नसल्याचे दाखवून दिले आहे. याप्रकरणी सनि गणेश शिक्का यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार फौजदार चावडी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध बुधवारी मध्यरात्री गुन्हा दाखल केला.स.पो.नि. धायगुडे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.