Type Here to Get Search Results !

१३ वर्षे न सुटलेला प्रश्न १३ दिवसात निकाली !


                                      (प्रतिकात्मक छायाचित्र)
श्रीमती सुनीता हनुमंत काळे यांचा शालार्थ
प्रणालीमध्ये समावेश करण्याचा आदेश

सोलापूर : शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केलेल्या हनुमंत काळे मृत्यू प्रकरणी जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली होती. त्यानुसार पुणे येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयाने, बुधवारी, २३ ऑगस्ट रोजी श्रीमती सुनीता हनुमंत काळे  यांचा समावेश शालार्थ प्राणालीमध्ये करण्यास मान्यता दिली. शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांच्या आदेशानुसार १३ वर्षे न सुटलेला प्रश्न १३ दिवसात निकाली निघाला आहे.

चंद्रभागाबाई यलगुलवार शाळेतील शिपाई हनुमंत विठ्ठल काळे यांनी १० ऑगस्ट रोजी मागील १३ वर्षापासून चुकीचा शालार्थ आयडी दिल्याने पगार मिळत नाही, म्हणून शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली होती. जिल्हा प्रशासनाने मयताची पत्नी श्रीमती सुनीता हनुमंत काळे यांना तात्काळ अनुकंपा तत्वावर त्या शाळेत शिपाई सेवक पदावर भरतीचे आदेश दिले होते. 

या आदेशानुसार मयत हनुमंत काळे यांच्या पत्नी श्रीमती सुनीता हनुमंत काळे ह्या अनुकंपा भरतीनुसार चंद्रभागाबाई यलगुलवार शाळेत शिपाई सेवक म्हणून प्रति महा ८ हजार रूपये मानधनावर कार्यरत राहतील. शिक्षण उपसंचालक कार्यालयाने शालार्थ प्रणालीमध्ये समावेश करण्याबाबत दिलेल्या मान्यतेनंतर उर्वरित माहिती संबंधित शाळेने भरून अधिक्षक, वेतन पथक (माध्यमिक) सोलापूर यांच्या लॉग इन ला पाठवून मान्य करून घेण्याचे शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी आदेशित केले  आहे.