Type Here to Get Search Results !

सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; अन्यथा पालकमंत्र्यांना फिरकू देणार नाही : प्रा. लक्ष्मण हाके

माळशिरस : सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून जाहीर करा अन्यथा पालकमंत्र्यांना जिल्हयात पाय ठेवू देणार नाही तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना शिवसैनिक शेतकऱ्यांसह घेराव घालतील, असा इशारा शिवसेना प्रवक्ते प्रा. लक्ष्मण हाके यांनी शनिवारी दिला.

युवा सेना आणि शिवसेनेच्या वतीने माळशिरस तालुक्यातील पिलीव, सुळेवाडी, कारखेल, जळभावी, गोरडवाडी, गारवाड इत्यादी भागातील टंचाईग्रस्त वाड्या वस्त्यावरती जाऊन शेतकऱ्यांना मेंढपाळांच्या भेट घेण्यात आल्या. त्यावेळी शिवसेना प्रवक्ते लक्ष्मण हाके बोलत होते.
  
आज आम्ही बांधांवर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत आहोत.शेतीसाठी पाण्याची तीव्र टंचाई आहे. मेंढपाळ तसेच पशुपालक शेतकऱ्यांपुढे चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. निम्मा पावसाळा संपल्याने खरिपाचा हंगाम पुर्ण वाया गेल्याने शेतकऱ्यांचे अर्थिक चक्र कोलमडले आहे. या प्रश्नांवर शासनाने यात त्वरित लक्ष घालावे, असे प्रा.  हाके यांनी म्हटले.

चारा डेपो सुरू करावेत, पिण्याच्या पाण्यासाठी त्वरित टँकर सुरू करावेत, वन विभागाकडून मेंढपाळांना चराईसाठी परवानगी मिळावी, पावसाअभावी करपून गेलेली खरीपातील सर्व पिके, धन-धान्य यांना सरसकट विमा मिळावा, अशा मागण्याही प्रा. हाके यांनी यावेळी केल्या. 

आठवड्याभरात चारा डेपो चालू झाले नाहीत आणि सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने, युवा सेनेच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात उग्र आंदोलन उभे केले जाईल, असा इशाराही प्रवक्ते प्रा. हाके यांनी दिला.

जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आमदार, खासदार जनतेच्या प्रश्नावर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला तयार नाहीत. हे सर्व आमदार खासदार टेंडर कमिशन यामध्ये गुंतल्याने सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही, असा गंभीर आरोप देखील प्रा. हाके यांनी यावेळी केला.

यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे, शिव सेना तालुकाप्रमुख संतोष राऊत, युवा सेना तालुकाप्रमुख सुभाष काकडे, युवासेना तालुका उपप्रमुख डॉ. निलेश कांबळे, दत्तात्रय साळुंखे, दुर्वा आडके, संदीप भैया कदम, शिवसेना शहर प्रमुख योगेश देशमुख, युवा सेना शहर प्रमुख देवा लोखंडे, उमाजी बोडरे, अॅड. ओम कालेकर, ज्ञानदेव लेंगरे, निशांत दोलताडे, रामचंद्र सुळे, प्रवीण माने, बंडू नरळे, जीवन लोखंडे, सुनील मिसाळ, अजय नाईक नवरे, अर्जुन लोखंडे यांच्यासह युवा सैनिक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.