Type Here to Get Search Results !

बालाजी अमाईन्सचे काम उल्लेखनिय : जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे


सीएसआरच्या माध्यमातून ४० शाळांना शालेय साहित्यांचे वाटप

सोलापूर /२५ : ज्या गोष्टी प्रशासनास साध्य करण्यास वेळ लागतो, त्या गोष्टी बालाजी अमाईन्स कंपनीने सीएसआरच्या माध्यमातून खूप कमी वेळात पूर्ण केले असून समाजातील त्यांचे काम उल्लेखनीय असल्याची प्रशंसा उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी केली.

बालाजी अमाईन्सकडून सीएसआर अंतर्गत सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील ४० शाळांना संगणक, प्रोजेक्टर, स्मार्ट टीव्ही, स्मार्ट बोर्ड, विज्ञान प्रयोगशाळा साहित्य व बेंचेस इत्यादी शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मनीषा आव्हाळे, केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय अधिकारी अंकुश चव्हाण उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना बोलत होते.

 मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे आणि अंकुश चव्हाण यांनी देखील कंपनी करीत असलेल्या कामांचे कौतुक करून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी सर्व शाळांना मिळालेल्या वस्तूंचा व्यवस्थित वापर करण्याचे आवाहनही केले.

यावेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी, संचालक एन. राजेश्वर रेड्डी, स्वतंत्र संचालक डॉ. सुहासिनी शहा व डॉ. उमा प्रधान आणि तांत्रिक सल्लागार मल्लिनाथ बिराजदार उपस्थित होते.

हॉटेल बालाजी सरोवर प्रीमिअर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात दोन्ही जिल्ह्यातील तुळजापूर, रामवाडी, जळकोट, हंगरगा, केशेगांव, नाईकनगर, नळदुर्ग, वडगांव, दुत्ता, उस्मानाबाद, सोलापूर शहर, सावळेश्वर, बीबीदारफळ, रानमसले, नांदणी, वळसंग, बिरवडे, वाफळे, उजनी, यतनाळ, मंद्रूप, या गावातील ४० शाळांनी शैक्षणिक साहित्य स्वीकारले.