Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय छावा संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी



मुख्यमंत्री साहेब, कृत्रिम पाऊस पाडा !

मुंबई : बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाने मागील दीड महिन्यापासून उघडीप घेतली आहे. पाऊस नसल्याने खरीप पीक माना टाकत आहे. पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर होत आहे. संभाव्य पाणी संकट लक्षात घेऊन मुख्यमंत्री साहेब, बीडसह दुष्काळजन्य भागात कृत्रिम पाऊस पाडा, अशी मागणी राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष गंगाधर काळकुटे-पाटील यांनी एका निवेदनाद्वारे केलीय.

खरीप हंगामाच्या पेरणीच्या वेळेस जेमतेम पाऊस झाला. पावसाअभावी काही भागात पेरण्या विलंबाने झाल्या. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने मराठवाड्यातील बीड जिल्ह्यासह राज्यातील अन्य भागात भर पावसाळ्यात दुष्काळजन्य परिस्थिती झाली आहे. त्या ठिकाणी कृत्रिम पाऊस पाडण्याची यंत्रणा युद्ध पातळीवर हाती घ्यावी, अशी मागणी शुक्रवारी,  गंगाधर काळकुटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे केली आहे.

यंदा बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसाने अत्यल्प हजेरी लावली आहे. झालेल्या तुरळक पावसावर शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने खरीप पिकाची लागवड केली. मागील दीड महिन्यापासून पावसाने अचानक उघडीप घेतली आहे. उन्हाळ्यासारखी परिस्थिती भर पावसाळ्यात निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. खरीप पिकं माना टाकत आहेत.

शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आजच गंभीर बनला आहे. जर पावसाने अशीच पाठ फिरवली तर भविष्यात याहीपेक्षा गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. पाण्याची संभाव्य गंभीर परिस्थिती लक्षात घेता, शेतकरी-कष्टकरी वर्गाचे कैवारी म्हणून संपूर्ण महाराष्ट्र मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मोठ्या आशेने पाहत आहे, असेही गंगाधर काळकुटे यांनी त्यांच्याशी बोलताना म्हटले.

 मुख्यमंत्री साहेब, बीड जिल्हासह मराठवाडा व महाराष्ट्रातील ज्या-ज्या भागात पावसाने पाठ फिरवली आहे.दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या ठिकाणी कृत्रिम पाऊस पाडण्याची शासकीय यंत्रणा कार्यान्वित करावी, यासंदर्भात तातडीने निर्णय घ्यावेत आणि प्रत्यक्ष तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष गंगाधर काळकुटे पाटील यांनी केली आहे.