Type Here to Get Search Results !

शस्त्रक्रिया शिबिरासाठी 'रोटरी' ची टीम जातेय काश्मीरला : माजी प्रांतपाल डॉ. राजीव प्रधान



शस्त्रक्रिया शिबिरासाठी 'रोटरी' ची टीम जातेय 
काश्मीरला : माजी प्रांतपाल डॉ. राजीव प्रधान

सोलापूर : रोटरीच्या शल्यचिकित्सक (सर्जन) व स्वयंसेवकांची ३५ जणांची टीम ०३ ते १३ सप्टेंबर दरम्यान काश्मीर खोऱ्यातील अनंतनाग, पुलवामा, शोपीयान आणि कुलगाम या ठिकाणी विविध प्रकारच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी जाणार आहे, असल्याची माहिती या मोहिमेचे टीम लीडर माजी प्रांतपाल डॉ. राजीव प्रधान यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन काश्मीरमधील सरकार व रोटरीने संयुक्तपणे केले आहे. काश्मीरचे महामहीम लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी या शिबिरासाठी रोटरीला निमंत्रित केले आहे. या शिबिरामध्ये महाराष्ट्र, गुजरात आणि पंजाबमधील सर्जन्स सहभागी होत आहेत. संपूर्ण शिबिराच्या आयोजनाची जबाबदारी माजी प्रांतपाल डॉ. राजीव प्रधान व माजी प्रांतपाल डॉ. गिरीश गुणे (पनवेल) यांच्याकडे आहे.

सोलापुरातील सर्वश्री डॉ. संजय मंठाळे (कान, नाक,घसा तज्ञ), अस्थिरोग तज्ञ डॉ. शशिकांत गंजाळे, डॉ. असित चिडगुपकर, स्त्रीरोग तज्ञ डॉ. मीनल चिडगुपकर हे शल्यचिकित्सक (सर्जन) सहभागी होत असून संगणक तज्ञ सौ. धनश्री केळकर या स्वयंसेवक म्हणून जाणार आहेत, असं डॉ. राजीव प्रधान यांनी सांगितले.

शिबिरासाठी काश्मीर सरकारतर्फे शस्त्रक्रियेची गरज असणाऱ्या रुग्णांचे सर्वेक्षण आणि पूर्व तपासणी झालेली असून १५०० पेक्षा अधिक रुग्णांची नोंदणी झालेली आहे. यामध्ये गुंतागुंतीच्या तसेच मोठ्या शस्त्रक्रिया होणार असून किडनी गॉल ब्लाद्दर ( gaulbladder),अस्थिरोग, कान-नाक-घसा,  मोतीबिंदू, प्लास्टिक सर्जरी आणि स्त्री रोगांवरील तसेच लहान मुलांवरील शस्त्रक्रियांचा समावेश असल्याचेही डॉ. प्रधान यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले.

काश्मीर सरकारने या शिबिरासाठी सर्व रुग्णालयांमध्ये अतिरिक्त स्टाफ, डॉक्टर तसेच ज्यादा शस्त्रक्रियाग्रहांचे(ऑपरेशन थिएटर) नियोजन केले आहे. भारताच्या एकात्मतेसाठी आणि काश्मीरला मुख्य प्रवाहात सामावून घेण्याच्या दृष्टिकोनातून एक नवा संदेश या शिबिरामार्फत जनतेस दिला जाणार आहे.

रोटरी इंटरनॅशनलतर्फे गेल्या पंचवीस वर्षांमध्ये भारतामध्ये उदगीर , जालना, उधमपूर तसेच आफ्रिकेतील १८ देशांमध्ये डॉक्टर प्रधान यांच्या यशस्वी आयोजनातून ४६ शिबिरे पार पडली आहेत. या शिबिरांमध्ये एक लाखांहून अधिक रुग्णांवर शस्त्रक्रिया झाल्या असून , दक्षिण आफ्रिकेच्या अनेक देशांमध्ये भारताचे नाव "मदत करणारा देश" म्हणून अधोरेखित झाले आहे. यंदाच्या शिबिरात देखील अशीच चांगली कामगिरी करण्याचे ध्येय रोटरीच्या टीमने बाळगले आहे. या पत्रकार परिषदेस डॉ. संजय मंठाळे, शशिकांत गंजाळे ,असित चिडगुपकर, मीनल चिडगुपकर, धनश्री केळकर, जयेश पटेल, संदीप जव्हेरी आदी उपस्थित होते.

........ चौकट ...........

गतवर्षी झाल्या होत्या, २४९९ शस्त्रक्रिया

गतवर्षी मे महिन्यात उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला, कुपवाडा, गंदरबल या जिल्ह्यात असेच एक रोटरीचे शिबीर डॉ. राजीव प्रधान यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले होते. त्या शिबिरामध्ये अवघ्या ९ दिवसात २४९९ शस्त्रक्रिया पार पडल्याने एक नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. या शिबिरातील झालेल्या शस्त्रक्रियांमुळे प्रभावित होऊन राज्यपाल सिन्हा यांनी पुन्हा एकदा पुढाकार घेत शिबिराचे आयोजन करण्याचा रोटरीला मान मिळाला आहे.