आश्रम शाळेतील १६८ विद्यार्थ्यांना विषबाधा
संस्थेतील ०५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
सांगली : जिल्ह्यातील उमदी येथील समता आश्रम शाळेत निवासी पद्धतीने राहणाऱ्या १६८ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची खळबळजनक घटना रविवारी, २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडलीय. या सर्व मुले-मुली विद्यार्थ्यांना नजीकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. याप्रकरणी श्रीशैल कल्लाप्पा होर्तीकर यांच्यासह पाच जणांविरुद्ध बुधवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेमुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
जत तालुक्यातील उमदी येथील समता प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील १६८ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार पुढे आल्यावर शासकीय यंत्रणेला जाग आली आहे. त्या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना आश्रम शाळेत जेवण न बनविता, बाहेरील कार्यक्रमात बनविलेले शिल्लक राहिलेले जीवन निष्काळजीपणाने सर्व विद्यार्थ्यांना दिल्यामुळे त्यांना अन्नातून विषबाधा होऊन, त्यांचे जीवित व व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आल्याचा निष्कर्ष पुढे आलाय. या खळबळजनक घटनेची माहिती मिळताच जत विभागाचे पोलीस उपअधीक्षक, आणि उमदी पोलीस ठाण्याचे सपोनि शिंदे यांनी घटना स्थळास भेट दिली होती.
याप्रकरणी सांगलीचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त जयंत मुरलीधर चाचरकर यांनी उमदी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार श्रीशेल कल्लाप्पा होर्तीकर, सुभाषचंद्र महादेवअप्पा होर्ती, सुरेश चनगोंडा बगली, विकास तुकाराम पवार आणि अक्कमहादेवी सिद्धण्णा निवर्गी ( सर्व राहणार : उमदी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोउनि शिंदे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.