Type Here to Get Search Results !

दातृत्व असणारा दाता मिळणे दुर्लभ : शिवपुत्र स्वामीजी

रक्षाबंधननिमित्त २५० विद्यार्थिनींना मिळाला नवीन ड्रेस                          
सोलापूर : शतेशू जायते शूर म्हणजे शंभर जणात एक जण शूर असतो. सहस्त्रेशू पंडित म्हणजे हजार जणांत एक ज्ञानी असतो. वक्ता दशसहस्त्रेशू म्हणजे १० हजार जणांत एक वक्ता असतो. दाता भवती वा नवा म्हणजे इतक्या जणात दाता असतोच असे नाही. म्हणजे दातृत्व असणारा दाता मिळणे दुर्लभ आहे. मात्र सुदैवाने समाजसेवक दत्ताअण्णा सुरवसे हे दाता आपल्या जवळ आहेत, असे प्रतिपादन श्री बसवारूढ मठाचे शिवपुत्र स्वामीजी यांनी केले.

उद्योगपती व समाजसेवक दत्ताअण्णा सुरवसे यांच्या दातृत्वातून आणि वीरशैव व्हिजन च्या माध्यमातून रक्षाबंधन निमित्त केंगनाळकर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील २५० विद्यार्थिनींना नवीन ड्रेस वितरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर उद्योजिका वैशाली सुरवसे, केंगनाळकर प्रशालेचे अध्यक्ष शरणराज केंगनाळकर, सचिवा कविता केंगनाळकर, वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, विश्वस्त सोमेश्वर याबाजी, कोषाध्यक्ष आनंद दुलंगे, सहकोषाध्यक्ष विजयकुमार बिराजदार उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती प्रतिमा पूजनाने करण्यात आली. प्रारंभी राजशेखर बुरकुले यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते २५० विद्यार्थिनींना ड्रेसचे वाटप करण्यात आले.

शिवपुत्र स्वामीजी पुढे बोलताना म्हणाले की, दातव्यं भोकतव्यं सती म्हणजे दान केले पाहिजे आणि घेणाऱ्याने घेतले पाहिजे. विभवे संचयौ न कर्त्यव्यं म्हणजे संपत्तीचे संचय करू नये. पश्चेह मधुकरीणा संचितम अर्थ हरनत्यन्ये म्हणजे मधमाशी पोळ्यामध्ये मधाचे संचय करते, पण ते मध दुसराच खात असतो, असेही त्यांनी यावेळी म्हटले. 

केंगनाळकर प्रशालेचे प्राचार्य विद्यानंद स्वामी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोमनाथ चौधरी, चेतन लिगाडे, मेहुल भुरे यांनी परिश्रम घेतले. 

फोटो ओळी : 
केंगनाळकर प्रशालेतील २५० विद्यार्थिनींना नवीन ड्रेस वितरणप्रसंगी शिवपुत्र स्वामीजी, वैशाली सुरवसे, शरणराज केंगनाळकर, कविता केंगनाळकर, राजशेखर बुरकुले, सोमेश्वर याबाजी, आनंद दुलंगे, विजयकुमार बिराजदार, विद्यानंद स्वामी, सोमनाथ चौधरी छायाचित्रात दिसत आहेत.