उस्मानाबाद : प्रतिनिधी
उस्मानाबाद शहरातील वसंतदादा नागरी सहकारी बँकेच्या विरोधात बातम्या देत असल्याचा राग मनात धरून बँकेचे तत्कालिन चेअरमन विजय दंडनाईक, व्यवस्थापक दिपक देवकते, संचालक मंडळ व कर्मचारी हे दैनिक एकमतचे पत्रकार सुभाष कदम यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या अंगाकर गाडी घालणे, कट मारणे असे प्रकार करीत आहेत. संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी जिल्ह्यातील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने सोमवारी दि. २१ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दैनिक एकमत जिल्हा कार्यालयात सुभाष कदम हे उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी वसंतदादा बँकेच्या विरोधात व फसवणूक झालेल्या ठेवीदारांच्या बाजूने अनेक बातम्या एकमतमध्ये प्रसिद्ध केल्या आहेत. बातमीची ही मालीका सुरूच आहे. ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बँकेचे तत्कालिन चेअरमन विजय दंडनाईक, व्यवस्थापक दिपक देवकते, संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांचा विरोधात उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात २७ जुलै रोजी गुन्हा दाखल झाला आहे. ठेवीदारांची कशी फसवणूक झाली, चेअरमन यांनी कोट्यवधी रूपयांचे कर्ज कसे बनावट फाईली तयार करून उचलले, त्याची परतफेड केली नाही, या संदर्भात अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.
याचा राग मनात धरून अनोळखी व्यक्ती पत्रकार सुभाष कदम यांच्या दुचाकीला कट मारणे, गाडी अंगावर घालणे, असे प्रकार करीत आहेत. भविष्यात त्यांच्या जीवीतास धोका निर्माण झाल्यास वसंतदादा बँक घोटाळा प्रकरणातील आरोपींना जबाबदार धरावे, संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
निवेदनावर सुभाष कदम, अनंत अडसूळ, महेश पोतदार, देवीदास पाठक, कालीदास म्हेत्रे, मच्छींद्र कदम, कैलास चौधरी, रवींद्र केसकर, प्रमोद राऊत, उपेंद्र कटके, सुधीर पवार, बालाजी निरफळ, सयाजी शेळके, मल्लिकार्जुन सोनवणे, रहिम शेख, हुंकार बनसोडे, कुंदन शिंदे, अजित माळी, सलीम पठाण, पांडुरंग मते, बाबूराव चव्हाण, रियाज शेख आदी पत्रकारांच्या सह्या आहेत.