सोलापूर : अक्कलकोट तालुक्याचा 'भाग्य विधाता' मानले जाणारे कुरनूर धरण सध्यस्थितीत कोरडे आहे. मुक्या जनावरांच्या चारा-पाण्याचा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. अशा अवर्षण स्थितीत पितापूर येथे समस्त ग्रामस्थ, गावकरी मुस्लिम बांधव मिळून हरणा नदीच्या कोरड्या पात्रात पावसासाठी सामुहिक नमाज पठण करून अल्लाहकडे 'जमिन, पाणी पाणी कर' अशी प्रार्थना केलीय.
मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह राज्याच्या अनेक भागात पावसाने पाठ फिरवली आहे. सध्याच्या अवर्षण स्थितीत खरीप हंगाम धोक्यात आला आहे. शेतकऱ्यांना खरीप पिकांच्या संभाव्य नुकसानीबरोबर मुक्या जितराबांच्या चारा-पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. अशीच स्थिती उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर बरोबरच अक्कलकोट तालुक्याची आहे.
तालुक्यातील हाता-तोंडाशी आलेले सोयाबीन, उडीद व इतर पिके संकटात आली आहेत. पुढील २-३ दिवसात पाऊस नाही पडला, तर परिस्थिती अत्यंत बिकट होणार असल्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे. शासनाने दुष्काळ जाहीर करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जातत आहे.
माणूस संकटात आला की, ईश्वराचा धावा करतो. मदतीसाठी याचना करतो, अशीच याचना अक्कलकोट तालुक्यातील पितापूर येथे सर्व ग्रामस्थ व मुस्लिम बांधवांनी हरणा नदीच्या कोरड्या पात्रात सामुहिक नमाज पठण करून अल्लाहकडे पावसासाठी प्रार्थना केलीय.