Type Here to Get Search Results !

'त्यांचा' बंदोबस्त करण्याची मागणी ‌

 ‌                                     (प्रतिकात्मक छायाचित्र) ‌        
कासेगाव शिवारात रानडुकरांचा धुमाकूळ

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव परिसरात पावसाने दडी मारल्याने खरीप पिकं संकटात आली आहेत. या संकटात शिवारात रानडुकरांचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांच्या संकटात भर पडली आहे. वनविभागाने या रानडुकरांचा तत्परतेने बंदोबस्त करावा,  अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात आली आहे.

या खरीपात विलंबाने अत्यल्प पाऊस आल्याने पेरण्या उशीरा झाल्या. पावसाने जवळपास एक महिना धरलेली ओढ अन् उन्हाच्या तीव्रतेने सोयाबीन, तूर, मूग, उडीद वगैरे खरीप पिकं सुकू लागली आहेत. ती हातची पिकं जात असल्याचे पाहून शेतकरी भयाच्या सावटाखाली दिसत आहे.

यंदाच्या खरीप हंगामात पुरेसा पाऊस न झाल्याने शिवारातील नाले-बंधारे अन् ओढे अद्याप कोरडेच आहेत. त्यामुळे विहिरींच्या पाणीपातळीत तसूभरही वाढ झालेली नाही. त्यात शेतकऱ्यांसाठी नगदी उत्पन्न म्हणून पाहिला जाणारा ऊस सांभाळणे, शेतकऱ्यांसाठी एक आव्हान बनलंय.   
एकीकडे पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे तर जीव मुठीत धरून पीक सांभाळत लेकरासारखी जपणूक केली जात आहे, अशा आणिबाणीच्या क्षणी रानडुकरांच्या उच्छादामुळं ऊसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. यावर वनविभागाने तत्परतेने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी अण्णा चौगुले यांनी केली आहे