संगमेश्वर महाविद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग
सोलापूर : व्यंकटेश नगर कुमठा नाका येथील बालाजी मूकबधिर व मतिमंद शाळेत विशेष शिक्षक भगवान चौगुले यांच्या संकल्पनेतून मंगळवारी, २२ ऑगस्ट रोजी " दिव्यांग मित्र" या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये संगमेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. ए. व्ही. साखरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे जवळपास तीस विद्यार्थी-विद्यार्थीनी स्वयंसेवक सहभागी झाले होते.
मनोज माडाळे व प्रगती गोरे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिव्यांग मित्रांना वह्या पेन मिठाई व फळे वाटप केले. त्यांनी या उपक्रमाच्या आडून आपला वाढदिवसाचा आनंद दिव्यांग विद्यार्थ्यासमवेत साजरा करून सामाजिक बांधिलकी जपली. त्यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या समस्या शैक्षणिक प्रगती याची माहिती जाणून घेतली.
या शाळेत अनेक उपक्रम राबविले जातात. त्यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांची प्रगती कौतुकास्पद आहे. असे प्रमुख पाहुणे ए. व्ही. साखरे यांनी गौरवोद्गार आपल्या भाषणात व्यक्त केले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक इरफान चौधरी तर प्रमुख उपस्थिती शामराव वाघमारे सुरेखा चव्हाण बालाजी दिकोंडा होते. या उपक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक भगवान चौगुले तर आभार इरफान चौधरी यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक अरविंद कुलकर्णी, मतिमंद शाळेचे समन्वयक सुरेश इटकर, श्रीनिवास पवार, नागेश चव्हाण यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमाचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर, संगमेश्वर महाविद्यालयाचे आधारस्तंभ धर्मराज काडादी, स्वामी समर्थ अपंग सेवा मंडळाच्या सचिवा लक्ष्मीबाई इटकर, श्रीनिवास इटकर, संजीवकुमार इटकर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.