सोलापूर : भाऊबीजेच्या पवित्र सणाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीच्यावतीने गुळवंची गावातील वंचित आणि निराधार महिलांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. यावेळी महिलांना साड्या व दिवाळीचा फराळ वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
दिवाळी हा आनंद, प्रेम, आपुलकी आणि बंधु-भावाचा सण आहे. समाजातील गरजू व वंचित घटकांनाही सणाचा आनंद घेता यावा, या उदात्त हेतूने क्लबच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. महिलांना साडी व फराळ देऊन त्यांच्याप्रती आदर, सन्मान आणि आपुलकीची भावना व्यक्त करण्यात आली. या उपक्रमाचे आयोजन क्लबचे अध्यक्ष रोटे. बसवराज बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
यावेळी क्लबचे प्रेसिडेंट इलेक्ट व सचिव रोटे. संतोषकुमार सावळगी, रोटे. नागेश शेंडगे, रोटे. सत्यम दुधाणकर, रोटे. महेश साळुंके, रोटे. अकबर नदाफ, रोटे. समीर नदाफ, रोटे. विशाल कोंटम, रोटे. अण्णा दीक्षित आणि रोटे. सुहास भोसले उपस्थित होते.
समाजातील वंचित घटकांसोबत सण साजरा करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा आणि माणुसकीचा संदेश देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.


