पुणे न्यायालय परिसरात गोळीबार ! कात्रज हत्या प्रकरणातील आरोपीवर कोयत्याने हल्ला

shivrajya patra

जखमीची प्रकृती चिंताजनक... खूनाचा बदला घेण्यासाठी हल्ला ?


पुणे/रमजान मुलाणी : कात्रज हत्या प्रकरणातील आरोपी मंदार किवळेवर शिवाजीनगर न्यायालय परिसरात गोळीबार आणि कोयत्याने हल्ला करण्यात आलाय. या भयावह घटनेकडं 'खून का बदला खून' अशा नजरेतून या हल्याकडं पाहिलं जातंय. 


शुभम चव्हाण हत्या प्रकरणातील आरोपी मंदार किवळे चार दिवसांपूर्वीच जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता. न्यायालयीन कामासाठी आलेल्या मंदारला 04 - 05 जणांनी घेरलं, आधी गोळीबार केला आणि त्यानंतर कोयत्याने वार करत हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले. 


शिवाजीनगर जिल्हा आणि सत्र न्यायालयाबाहेर हा थरार घडला. प्रथम गोळीबार केल्यावर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वार क्रमांक 04 जवळ ही घटना घडलीय. हल्लेखोरांनी प्रथम गोळीबार केला. त्यानंतर कोयत्याने हा खूनी हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यात मंदार किवळेचे दोन्ही हात छाटण्यात आल्याची प्राथमिक माहिती पुढं येतेय. घटनास्थळी तातडीनं पोलिसांचा  बंदोबस्त वाढविण्यात आलाय.



पोलीस हल्ल्यामागील कारणाचा तपास करीत असून शुभम चव्हाणच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आणि पूर्ववैमनस्यातून हा प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती समोर येतेय. या घटनेनंतर पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


दरम्यान, गोळीबार आणि कोयता हल्ल्यातील जखमी मंदार किवळे याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. पुढील 72 तास सांगता येणार नाही; गोळीबार आणि कोयता हल्ल्यात जखमी झालेला मंदार हा गंभीर जखमी असल्याची माहिती ससूनचे डीन जाधव यांनी दिलीय.

To Top