सोलापूर : अरण्यऋषी पद्मश्री स्व. मारुती चित्तमपल्ली यांचे चाहते, निसर्गप्रेमी, अभ्यासक आणि हितचिंतक यांच्या पुढाकारातून येत्या गुरूवारी, 05 नोव्हेंबर रोजी 'अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली संदर्भ ग्रंथालय' केंद्राचा उद्घाटन सोहळा आणि वेबसाइटचे लोकार्पण आयोजित करण्यात आलं आहे.
थोर पर्यावरणवादी, निसर्ग अभ्यासक, साहित्यिक आणि 'अरण्यऋषी' म्हणून सर्वत्र परिचित असलेले पद्मश्री मारुती चित्तमपल्ली यांनी आपले संपूर्ण आयुष्य निसर्गाच्या रहस्यांचा शोध घेण्यासाठी, त्याच्या सखोल अभ्यासासाठी आणि निसर्गसंपदेच्या संवर्धनासाठी समर्पित केले. त्यांच्या अथक परिश्रमांतून, अखंड ध्यासातून आणि निरंतर भटकंतीतून साकारलेले प्रयोग, मौलिक नोंदी, विपुल साहित्य तसेच विविध भाषांतील आणि जगभरातील दुर्मिळ ग्रंथ हा समाजासाठी अमूल्य ठेवा आहे.
या समृद्ध वारशाचे जतन व्हावं, नव्या पिढीला निसर्गाचा सखोल अभ्यास करण्याची प्रेरणा मिळावी आणि भावी संशोधकांना पर्यावरणविषयक संदर्भसाहित्य सहज उपलब्ध व्हावं, या उदात्त हेतूने सोलापुरात 'अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली संदर्भ ग्रंथालय' या ज्ञानकेंद्राची उभारणी करण्यात आली आहे.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, अरण्यऋषींनी आपल्या हयातीतच या संदर्भ ग्रंथालयाची संकल्पना मांडली होती. नव्या पिढीतील विद्यार्थी, अभ्यासक आणि संशोधकांना उपयुक्त ठरेल, तसेच भविष्यातील संशोधनासाठी मार्गदर्शक ठरेल, असे ज्ञानकेंद्र निर्माण व्हावे, अशी त्यांची मनापासून इच्छा होती. निसर्गाशी मैत्री करू पाहणाऱ्या आणि मानवी जीवन अधिक समृद्ध करण्यासाठी ज्ञानसाधना करणाऱ्या भावी पिढ्यांना आपला हा ज्ञानवारसा उपलब्ध करून देण्याची त्यांची धडपड होती.
वाढत्या वयामुळे आपल्या या स्वप्नाला प्रत्यक्षात साकार करण्याची जबाबदारी त्यांनी आपल्या कुटुंबीयांवर, विशेषतः पुतणे श्रीनिवास चित्तमपल्ली आणि श्रीकांत चित्तमपल्ली यांच्यावर सोपविली होती. त्यांनीही अरण्यऋषींच्या या संकल्पनेप्रति निष्ठा आणि श्रद्धा जपत ती प्रत्यक्षात साकार करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले.
--------
विशेष आकर्षण : 'बर्ड मॅन' सुमित वाघमारे यांचे अनोखे प्रात्यक्षिक !
--------
ताडोबा अभयारण्यातील प्रसिद्ध 'बर्ड मॅन' सुमित वाघमारे हे या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. जंगलातील 200 हून अधिक प्राणी-पक्ष्यांचे हुबेहूब आणि चित्ताकर्षक आवाज काढण्याचे अनोखे प्रात्यक्षिक ते सादर करणार आहेत.
वाघाची डरकाळी, पक्ष्यांचा किलबिलाट, विविध वन्यप्राण्यांचे अफलातून आवाज आणि जंगलातील विविध निसर्गध्वनी यांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची अनोखी संधी यानिमित्ताने उपस्थितांना मिळणार आहे.
---------
पक्षी सप्ताहाचे औचित्य
---------
अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली आणि ज्येष्ठ पक्षितज्ज्ञ डॉ. सलीम अली यांच्या जन्मदिनांचा कालावधी (05 ते 12 नोव्हेंबर) हा 'पक्षी सप्ताह' म्हणून साजरा केला जातो. कारण नोव्हेंबर महिना हा हिवाळी स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनाचा काळ असल्याने या सप्ताहादरम्यान राज्यभर पक्षिगणना, पक्षिनिरीक्षण, पक्ष्यांविषयी जनजागृती आणि जैवविविधतेच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम आयोजित केले जातात.
महाराष्ट्र शासनाने 2020 मध्ये या सप्ताहाला अधिकृत मान्यता दिली. त्यामुळे निसर्ग, पक्षी आणि जैवविविधतेच्या संरक्षणाच्या दृष्टीने या सप्ताहाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
अशा निसर्गसंवर्धनाच्या प्रेरणादायी सप्ताहात अरण्यऋषींच्या नावाने संदर्भ ग्रंथालयाचे उद्घाटन होणे, ही त्यांच्या निसर्गनिष्ठ कार्याला, ज्ञानसाधनेला आणि समृद्ध साहित्यिक वारशाला अभिवादन करणारी महत्त्वपूर्ण घटना ठरणार आहे.
या ज्ञानकेंद्राच्या माध्यमातून निसर्गप्रेमी, विद्यार्थी, अभ्यासक आणि संशोधक यांना एक समृद्ध संदर्भस्रोत उपलब्ध होईल, तसेच निसर्गसंवर्धनाची जाणीव नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
*****

