दुबईत व्यवसायाचे उत्तुंग शिखर, पण नाळ सोलापूरशीच; उद्योजक आयुब खान यांचा 15 वर्षांचा 'सेवा धर्म'

shivrajya patra

सोलापूर : आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारा मराठी माणूस जगभरात कुठेही गेला, तरी आपली मायभूमी आणि सामाजिक दायित्व कधीही विसरत नाही, याचं उत्तम उदाहरण म्हणजे दुबईस्थित प्रसिद्ध उद्योजक आयुब खान. गेल्या अनेक वर्षांपासून दुबईत वास्तव्य करणारे आयुब खान रिअल इस्टेट क्षेत्रात यशस्वी कामगिरी करत असून 'ग्लोबल इंटरप्रिन्योर कन्सल्टंट्स' (दुबई) या आंतरराष्ट्रीय व्यासपीठाशी जोडलेले आहेत.


आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःचा व्यवसाय सांभाळतानाच, महाराष्ट्रातील तरुण आणि होतकरू बेरोजगारांना दुबईत उद्योग-व्यवसाय उभारण्यासाठी ते मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य करतात. मराठी तरुणांनी जागतिक पटलावर उद्योजक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करावी, यासाठी ते अहोरात्र प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या पुढाकारामुळे अनेक मराठी तरुणांना परदेशात स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे स्वप्न पूर्ण करणे शक्य होत आहे.



व्यवसायातील या यशासोबतच आयुब खान यांनी जपलेली सामाजिक बांधिलकी विशेष प्रेरणादायी आहे. सोलापूर येथे गेल्या 15 वर्षांपासून ते सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत रक्तदाब (BP) व मधुमेह (शुगर) तपासणी शिबिरांचे सलग आयोजन करत आहेत. आजच्या धावपळीच्या युगात वाढत्या आजारांवर वेळेवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि नागरिकांना आरोग्याबाबत जागरूक करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत मोलाचा ठरत आहे.


आपल्या अत्यंत व्यस्त व्यावसायिक वेळापत्रकातून वेळ काढून गेली दीड दशकं निःस्वार्थ भावनेने सुरू असलेला हा सेवायज्ञ सोलापूरकरांसाठी दिलासादायक ठरला आहे. दुबईसारख्या जागतिक आर्थिक केंद्रात उद्योग जगतात भरारी घेऊनही सोलापूरच्या मातीशी आणि बांधवांशी घट्ट नाते जपणारे आयुब खान हे व्यवसायाच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपणारे एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहेत. दुबई सारख्या शहरात त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.


या पत्रकार परिषदेत आयुब खान, जगदीश दिड्डी व डॉ. पंजाब कत्ते हे उपस्थित होते.

To Top