सोलापूर : 'सखा माझा पांडुरंग' या भक्तीप्रधान मालिकेचे आजवर 500 हून अधिक भाग प्रदर्शित झाले, पुढील भागात काय असणार याची कल्पना कलाकार म्हणून आम्हालाही नसते. आपण भूमिका साकारताना एखादी भूमिका आपल्या मनात रुतून बसते. आतापर्यंत झालेल्या भागांमुळे माझ्या मनात सखुची भूमिका खूप रुतलेली आहे, कारण हा माझ्यासाठी एक आशीर्वाद आहे, असं 'सखा माझा पांडुरंग' मालिकेतील अभिनेत्री सान्वी जांभेकर यांनी म्हटले.
सन मराठी वाहिनीवर प्रदर्शित होत असलेल्या 'सखा माझा पांडुरंग' मालिकेतील अभिनेत्री सान्वी जांभेकर शुक्रवारी,09 ऑक्टोबर रोजी मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावी सन मराठी च्या टीमसह आल्या होत्या. निमित्त होतं... सन मराठीतर्फे आषाढी एकादशीनिमित्त पार पडलेल्या 'इच्छाकलश उपक्रमाला आला तुळशीरुपी बहर !' चं.
यंदाच्या आषाढी वारीसाठी तिर्थक्षेत्र आळंदी ते पंढरपूर आणि तिर्थक्षेत्र देहू ते पंढरपूर निघालेल्या दिंडी सोहळ्यात सन मराठी वाहिनीने, दिंडीत सहभागी वारकऱ्यांसाठी इच्छाकलश उपक्रम राबविला होता. सन मराठी च्या टीमने वारकऱ्यांचा इच्छा संकलित करताना, त्यासोबत तुळशीच्या बिया स्विकारल्या होत्या. नंदेश्वर इथं विठ्ठलाच्या टिळ्याच्या प्रतिकृतीत या बियांची लागवड केली होती.
गली चार-पाच वर्ष मी इंडस्ट्रीमध्ये आहे. स्ट्रगल करत होते, मला नेहमीच असं काहीतरी काम करण्याची इच्छा होती, दरम्यान सन मराठीवरील 'सखा माझा पांडुरंग' मालिकेत सखुची भूमिका साकारण्याची संधी मिळाली, इतक्या सुंदर प्रोडक्शन हाऊस बरोबर काम करायला मिळणं, इतक्या सुंदर आर्टिस्टबरोबर काम करायला मिळणं, इतक्या छान टीमबरोबर काम करायला मिळणं, हे फार क्वचितच बघायला मिळतं, या सगळ्यांचा समतोल बघायला मिळाला आणि मला ही संधी मिळाली, इथंच माझी इच्छा पूर्ण झाल्याचं अभिनेत्री सान्वी जांभेकर यांनी कृतार्थ भावनेने प्रारंभी म्हटले.
... चौकट
'सखु' विषयी थोडेसं !
आज नाही म्हणायला गेला तरी मनुष्यवृत्ती आहे, त्याच्या वेगवेगळ्या छटा आहेत पण सखुला तुम्ही बघाल तर तिचा मनात कोणाबद्दलच सूड भावना नाहीये. सगळ्यांवरती प्रेम करते, तिथे सासूबाई आहेत, नागोजी बाबा आहेत... अगदी तिचा नवरा सुद्धा... पण कधीच सखु त्यांच्या अहिताचा विचार करीत नाही, ती सगळ्यांसाठी तेवढ्यात प्रेमाने, तेवढ्याच आदराने राहत होती. हेच सखूकडून खरंच शिकण्यासारखे आहे.
तिचा विठुरायावरचा विश्वास ढळत नाही. तिच्यावर किती तरी संकट आली पण ती विठुरायाला हेच सांगत राहिली की, मी ह्यातून बाहेर पडेन, तू तुझी लीला दाखवू नकोस, नाहीतर लोकांना वाटेल मी चेटकी केली, तू जादू करू नकोस, मी संकटातून मार्ग काढीन, तू फक्त माझ्या पाठीशी उभा रहा असंचं, सखूची व्यक्तिरेखा सांगून जाते.
... ऑडिशन द्याव लागतं : सान्वी जांभेकर
कोणत्याही कलाकाराला ऑडिशन द्यावीच लागते,ते एक प्रोसिझर असतं, त्या प्रोसिझरमधून मोठ्यातल्या मोठ्या कलाकाराला सुद्धा जावंचं लागतं, मी अपवाद नाही. सखु ही व्यक्तिरेखा साकारणं तसं कठीण काम आहे, मात्र आवडीचं काम असलं तर कुठलाही माणूस कितीही कठीण काम सहज करु शकतो.
आमची एक टीम असते, त्यामुळे एक टीम म्हणून आम्ही काम करतो आणि टीम म्हणून आम्ही पुढे जातो आणि आम्हाला जे यश मिळतं, ते माझं एकटीच नसतं, ते अख्ख्या टीमचं यश असतं. त्यामुळे तो सगळा सांगाडा पुढे ओढणं हे कोणी एका माणसाचं काम नाही ते आम्ही सगळे मिळून करत असतो. त्यातून मी इथपर्यंत आले आहे, असं पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अभिनेत्री जांभेकर यांनी सांगितले.
...कदाचित सखुमुळे माझ्या आयुष्यातला विठुराया मला सापडेल : अभिनेत्री जांभेकर
एक माणूस म्हणून सखु आपल्याला बरच काही शिकवून जाते, आजच्या काळातल्या पिढीलासुद्धा सखुकडून किंवा या मालिकेत शिकण्यासारखं खूप आहे, दुसरं म्हणजे सखू मला माणूस म्हणून खूप काही शिकवते, तिचा प्रवास अजून खूप मोठा आहे, जसा माझा आणि सखूचा पण ! कदाचित सखूमुळे माझ्या आयुष्यातला विठुराया मला सापडेल, अशी आशा ही अभिनेत्री जांभेकर यांनी यावेळी व्यक्त केली.
विद्यार्थ्यांशीही साधला संवाद
या कार्यक्रमास नंदेश्वर येथील श्री बाळकृष्ण हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होत्या. त्यांनी अभिनेत्री सान्वी जांभेकर यांच्याशी संवाद साधला. कार्यक्रमास समारोपात सर्व विद्यार्थ्यांना तुळशीचं रोपटं भेट देण्यात आलं.
वारकरी परंपरेत तुळशीला अनन्य साधारण महत्व आहे. तुळस पर्यावरण संतुलन आणि ऑक्सिजन निर्मितीत इतर वृक्षांच्या तुलनेत अधिक हितावह आहे. हे रोपटे आपणास सकारात्मक उर्जा देईल. नवीन पिढीला पुढे जाण्यासाठी प्रेरित करणारं ठरेल, ग्लोबल वॉर्मिंगमुळं प्रदुषण खूप वाढलं आहे.
आपण झाडे लावूयात. त्यामुळे निसर्गात ऑक्सिजनचं प्रमाण नक्कीच वाढेल, कारण तुळस हे ऑक्सिजन निर्मितीचं खूप छान साधन आहे.
या विद्यार्थ्यांमधून उद्याचे डॉक्टर, इंजिनिअर पुढं येऊन देशासाठी काम करतील, असा अभिनेत्री सान्वी जांभेकर यांनी व्यक्त केलेला विश्वासही उपस्थितांच्या पंखाना बळ देणारा होता.
सन मराठी चॅनेलवर नक्की पहा, 'सखा माझा पांडुरंग'
आता 'सखा माझा पांडुरंग' मध्ये सखूच्या घरावर टाच आली आहे, त्या संकटातून ती कशी बाहेर पडते, तिच्या कुटुंबाला संकटातून कशी बाहेर आणतेय, हे बघण्यासाठी तुम्ही 'सखा माझा पांडुरंग' रोज संध्याकाळी 7.30 वाजता सन मराठी चॅनेलवर नक्की पहा, असंही सान्वी जांभेकर यांनी शेवटी म्हटले.
**









