उर्दू भाषेतील गोडवा थेट हृदयाला स्पर्श करतो : माजी गृह राज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे

shivrajya patra

जिल्हा परिषद उर्दू शाळा बोरामणीचा शताब्दी महोत्सव दिमाखात साजरा

दर्जेदार शाळेबरोबर मेहनती शिक्षक हेच उज्ज्वल भविष्य आणि सुसंस्कृत नागरिकांच्या निर्मितीचे आधार : डॉ. आसिफ इक्बाल

सोलापूर : उर्दू शाळेच्या शतक महोत्सवाच्या आयोजनाचा सोहळा आनंदोत्सव आहे. उर्दू भाषेचं सौंदर्य आणि तिचं सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित होणे क्रमप्राप्त आहे. ''उर्दू ही एक सुंदर आणि गोड भाषा आहे. तिच्यातील गोडवा थेट हृदयाला स्पर्श करतो.''  असं प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले.


सोलापूर शहराजवळील बोरामणी गावातील जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी माजी ग्रह राज्य मंत्री सिध्दाराम म्हेत्रे बोलत होते.


कार्यक्रमात बोलताना प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ डॉ. आसिफ इक्बाल यांनी आपल्या भाषणात सांगितले की, चांगल्या शाळा आणि मेहनती शिक्षक यांच्यामुळेच चांगल्या नागरिकांची निर्मिती होते. मातृभाषेतून दिले जाणारे शिक्षण विद्यार्थ्यांची आकलनशक्ती विकसित करते. त्यामुळे विद्यार्थ्यांना विषय समजून घेणे, ज्ञान आत्मसात करणे आणि यशाच्या दिशेने वाटचाल करणे सुलभ होते. 


शाळा या कोणत्याही समाजाच्या शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीचा मूलभूत आधार असतात. त्यामुळे शैक्षणिक संस्था आणि शिक्षकांच्या योगदानाची दखल घेणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.


मसूद सिद्दिकी यांनी शाळेच्या 100 वर्षांच्या यशस्वी वाटचालीबद्दल शाळेचे पदाधिकारी आणि आयोजकांचे अभिनंदन केले. 


शिक्षण विस्तार अधिकारी अतहर परवेज दफेदार यांनी जिल्हा परिषद उर्दू शाळा बोरामणीचा 100 वर्षांचा प्रवास हा एक महत्त्वपूर्ण शैक्षणिक टप्पा असल्याचे सांगितले. शाळेच्या ऐतिहासिक कार्याचा आणि समृद्ध शैक्षणिक परंपरेचा गौरव करण्यासाठी हा महोत्सव महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.


गावाचे सरपंच साळुंखे यांनी आपल्या भाषणात शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच उर्दू शाळेच्या जागेसंदर्भातील प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. शैक्षणिक संस्थांचा विकास आणि विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.


शतक महोत्सवानिमित्त आयोजित विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. तसेच या शाळेत सेवा बजावलेल्या माजी शिक्षकांचा आणि मुख्याध्यापकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 


त्यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या सत्कार सोहळ्यामुळे शाळेच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्याबरोबरच नव्या पिढीला त्यांच्या कार्याची ओळख करून देण्याची संधी मिळाली.


या कार्यक्रमाला शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह शिक्षक, माजी मुख्याध्यापक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रफीक नल्लामंदू आणि नौशीन मुजावर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका निशात पटेल आणि शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.


याप्रसंगी इंडीकर, केंद्रप्रमुख सुहेल नाईक, बाबा शेख, अब्बास शेख, गौसभाई, युसूफ पटेल, जावेद तगारे, हमीद पटेल, फिरोजा शेख, जकिया कम्पली, अफरोज शेख, मक्तूम पटेल, भारत कोडे, श्याम भोसले, महादेव खोबरे, कमलाकर भोसले, अजिज पठाण, मुन्ना पठाण, रफीक मुजावर, वजीर मुजावर, मलिक शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

To Top