ही निवडणूक पदवीधर-शिक्षकांची नाही, तर देशाच्या अस्तित्वाची ! सोलापूरात महाविकास आघाडीचा मेळावा ; हर्षदा देशमुख-जाधव व आसगावकर यांना बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार

shivrajya patra

सोलापूर : "आज लोकशाहीत निवडणुकीवरचा लोकांचा विश्वासच उडाला आहे, कारण मतदार याद्यांमध्येच घोळ असतो. मात्र, बॅलेट पेपरवर होणारी ही निवडणूक म्हणजे जनतेच्या मनातील रोष, महागाईचा संताप आणि भ्रष्टाचाराविरुद्धचा असंतोष मतपेटीतून बाहेर काढण्याची सुवर्णसंधी आहे," असा घणाघात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, आमदार जयंत पाटील यांनी सोलापुरात केला.


महाविकास आघाडीच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ सोलापुरात आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्यात ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार अभिजित पाटील, प्रकाश यळगूवार, रामहरी रुपनवर, सतलिंग शटगार, महेश गादेकर, चेतन नरुटे आदी मविआचे दिग्गज नेते आणि उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


काँग्रेस नेते, आमदार सतेज पाटील म्हणाले, ही निवडणूक महाराष्ट्राच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. हे दोन्ही उमेदवार प्रचंड मतांनी निवडून आणणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. पुढील सात दिवस कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन मविआच्या उमेदवारांची योग्यता मतदारांना पटवून दिली पाहिजे.


खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, देशाचा मूळ डीएनए हा संविधान आणि लोकशाही मानणारा आहे, पण हा डीएनए बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशाचे वाटोळे करण्याचे पाप मोदी-शहा करत आहेत. ही निवडणूक केवळ पदवीधर किंवा शिक्षकांची नसून देशाच्या अस्तित्वाची आणि लोकशाहीची ज्योत अखंड ठेवण्याची लढाई आहे.


खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी देशात बदलाचे वारे वाहू लागले आहेत आणि या बदलाचे खरे शिलेदार आपल्याला व्हायचे आहे असे सांगून सोलापूर जिल्ह्यातून महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना विक्रमी मताधिक्य देऊया असे आवाहन केले.



हर्षदा देशमुख-जाधव यांनी युवकांमध्ये आज प्रचंड रोष आहे. ही निवडणूक म्हणजे परिवर्तनाची नांदी असून, दडपशाही संपवून लोकशाहीचा विजय निश्चित करण्याची हीच वेळ आहे असे प्रतिपादन केले.

........

​चौकट : 

भाजपचा मित्रपक्षांवर अजिबात विश्वास नाही ! - जयंत पाटील

​मेळाव्यात पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांनी भाजपवर अत्यंत टोकाची टीका केली. भाजपने एक यादी जाहीर केली असून, महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आमदार जिथे आहेत, तिथेच भाजपचे आमदार-खासदार निरीक्षक म्हणून नेमले आहेत. यावरून स्पष्ट होते की भाजपचा त्यांच्याच मित्रपक्षांवर तिळमात्र विश्वास नाही, असा चिमटा जयंत पाटील यांनी काढला.

......

सतेज पाटलांनी कंबर कसली ; प्रचाराची सूत्रे हातात घेतली !

​फक्त भाषण करून न थांबता काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी सोलापुरात प्रचाराची प्रत्यक्ष धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. मेळाव्यानंतर खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील आणि आमदार अभिजित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस, राष्ट्रवादी व मविआच्या सर्व मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांची विशेष नियोजन बैठक त्यांनी घेतली. 


या बैठकीत प्रचार यंत्रणेचा सखोल आढावा घेऊन प्रत्येक नेत्याला आणि पदाधिकाऱ्याला जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या. जास्तीत जास्त मतदान करून मविआच्या दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

.......

 छायाचित्र

सोलापूर : पदवीधर व शिक्षक उमेदवारांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलतान जयंत पाटील, उपस्थित सतेज पाटील, प्रणिती शिंदे, धैर्यशील मोहिते-पाटील, अभिजित पाटील आदी मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत.

To Top