सोलापूर : जिल्हा कोषागार कार्यालय, सोलापूर अंतर्गत निवृत्तीवेतन व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी सन 2026-27 या वर्षासाठी हयातीचा दाखला सादर करण्याचे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. वैभव राऊत यांनी केले आहे. निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्यासाठी आता विविध सुलभ पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना खालीलपैकी कोणत्याही एका पद्धतीने हयातीचा दाखला सादर करता येणार आहे. ज्या बँकेच्या शाखेत निवृत्तीवेतन जमा होते, त्या बँकेत प्रत्यक्ष जाऊन बँक अधिकाऱ्यांच्या समक्ष हयातीच्या दाखल्याच्या यादीतील आपल्या नावा समोर स्वाक्षरी करावी.
https://jeevanpramaan.gov.in या जीवनप्रमाण संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन पद्धतीने हयातीचा दाखला सादर करता येईल.
हयातीच्या प्रमाणपत्रावर बँक अधिकारी अथवा राजपत्रित अधिकारी यांच्या समक्ष स्वाक्षरी करून ते प्रमाणपत्र जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करता येईल.
परदेशात वास्तव्यास असलेल्या निवृत्तीवेतनधारकांना तेथील भारतीय राजदूतावासामार्फत हयातीचा दाखला संबंधित जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करता येईल.
भारतीय डाक विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या (IPPB) माध्यमातून डिजिटल हयातीचा दाखला ऑनलाइन सादर करण्याची सशुल्क सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अँड्रॉइड स्मार्टफोन अथवा मोबाईलवर जीवनप्रमाण ॲप्लिकेशन डाउनलोड करून ऑनलाइन पद्धतीने हयातीचा दाखला सादर करता येईल.
निवृत्तीवेतनधारकांनी व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी वरीलपैकी सोयीस्कर पद्धतीचा अवलंब करून सन 2026-27 या वर्षासाठी हयातीचा दाखला सादर करावा, असे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा कोषागार कार्यालयाच्या solapur.pension@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा किंवा दूरध्वनी क्रमांक 0217 - 2731036 येथे संपर्क साधावा.
*****

