बार्शी : आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने गुरूवारी,10 सप्टेंबर रोजी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या उपस्थितीत बार्शी येथे गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य तसेच बार्शी उपविभागातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची शांतता समितीची बैठक पार पडली. यावेळी पर्यावरणपूरक उत्सव आणि 'No Dj, No Dolby' ची उपस्थितांनी शपथ घेतली.
या बैठकीस पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि पोलीस विभागातील अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी आगामी गणेशोत्सव शांततेत, पर्यावरणपूरक व ध्वनिप्रदूषणमुक्त वातावरणात साजरा करण्याचे आवाहन केले.
गणेश मंडळांनी शासनाने निर्धारित केलेल्या नियमांचे व ध्वनीमर्यादेचे काटेकोरपणे पालन करावं, 'No DJ, No Dolby' या संकल्पनेला प्राधान्य द्यावं, तसेच उत्सवादरम्यान सामाजिक सलोखा व शांतता अबाधित राहील याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
गणेशोत्सवादरम्यान कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये अथवा अफवा पसरवू नयेत. सोशल मीडियावरून प्रसारित होणाऱ्या कोणत्याही संशयास्पद किंवा प्रक्षोभक संदेशांची खातर जमा न करता त्यावर प्रतिक्रिया देऊ नये, असंही त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय येथे जिल्ह्यातील पोलीस अधिकारी यांची स्वतंत्र बैठक घेण्यात आली.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, गणेश मंडळांशी समन्वय साधणे, संवेदनशील ठिकाणी विशेष लक्ष ठेवणे, ध्वनिप्रदूषणास प्रतिबंध करणे, सोशल मीडिया व अफवांवर प्रभावी नियंत्रण ठेवणे तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत आवश्यक सूचना या बैठकीमध्ये देण्यात आल्या.
गणेशोत्सव हा आनंद, भक्ती आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव असून, सर्व गणेश मंडळे, नागरिक व पोलीस प्रशासन यांनी परस्पर समन्वयातून उत्सव शांततेत, उत्साहात, पर्यावरणपूरक व कायद्याचे पालन करून साजरा करावा, असं आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. याप्रसंगी 'No Dj, No Dolby' ची शपथ घेण्यात आली
या बैठकीकरीता विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा (कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर.), पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप तसेच उपविभागातील सर्व पोलीस अधिकारी/अंमलदार शांतता कमिटीचे सदस्य, सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते.
****




