विवेकसिंह पाटील याची एनसीसीच्या राष्ट्रीय थलसेना कॅम्पसाठी निवड; सैनिक टाकळीच्या शिरपेचात मानाचा तुरा

shivrajya patra

दिल्लीतील राष्ट्रीय कॅम्पमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व; खडतर प्रशिक्षणातून अंतिम निवड

कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथील सिनियर अंडर ऑफिसर विवेकसिंह विजयाराणी विनोदसिंह पाटील (रामजी) याची एनसीसीच्या राष्ट्रीय थलसेना कॅम्प- 2026 साठी निवड झाली. दिल्ली येथे 31 ऑगस्ट ते 11 सप्टेंबरदरम्यान सुरू असलेल्या राष्ट्रीय थलसेना कॅम्पमध्ये तो ‘जजिंग डिस्टन्स अँड फील्ड सिग्नल्स’ या विभागात सहभागी झाला आहे. या निवडीमुळे सैनिक टाकळीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.


यंदाच्या वर्षात अमरावती येथे 13 ते 23 जुलै तसेच 29 जुलै ते 28 ऑगस्ट या कालावधीत झालेल्या एनसीसी राज्यस्तरीय थलसेना इंटरग्रुप सिलेक्शन कॅम्पमध्ये महाराष्ट्रातील विविध ग्रुपमधून सहभागी झालेल्या कॅडेट्समधून विवेकसिंहची राष्ट्रीय स्तरासाठी निवड झाली. त्यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस येथे जून महिन्यात सुमारे 30 दिवस आणि त्यानंतर अमरावती येथे सुमारे 40 दिवस झालेल्या कठोर प्रशिक्षण व अविरत सरावातून त्याने ही निवड मिळवली.


विवेकसिंह हा कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये बी. टेक. तृतिय वर्षात शिक्षण घेत असून, 5 महाराष्ट्र बटालियन एनसीसी, कोल्हापूर अंतर्गत सैनिकी प्रशिक्षण घेत आहे. 5 महाराष्ट्र बटालियन एनसीसी कोल्हापूरचे सुभेदार मेजर, एनसीसीचे अधिकारी तसेच ऑनरेरी लेफ्टनंट प्रा. डॉ. राहुल महाजन यांचं  त्याला मार्गदर्शन लाभले.


फुटबॉलमध्येही राष्ट्रीय कामगिरी


विवेकसिंहने यापूर्वी महाराष्ट्र हायस्कूल, कोल्हापूर येथून माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील फुटबॉल स्पर्धेत तब्बल 03 वेळा राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं आहे. दिल्ली तसेच जम्मू-काश्मीर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यानं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केले.


एनसीसीच्या राष्ट्रीय थलसेना कॅम्पमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल विवेकसिंह पाटील याचं सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्याच्या भावी वाटचालीसाठी व देशसेवेच्या कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

To Top