निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करा : अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी

shivrajya patra

सोलापूर : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, त्यानुषंगाने निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी विविध विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या. पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांना आचारसंहिता लागू होत असल्याचे भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद आहे.


निवडणूक कालावधीत शासकीय विश्रामगृहाचा राजकीय बैठका किंवा अन्य राजकीय कारणांसाठी वापर होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच शासकीय वाहने पदाधिकारी व संबंधितांकडून जमा करून घेऊन त्यांचा निवडणूक आचारसंहितेचा भंग होणार नाही, अशा पद्धतीने वापर नियंत्रित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या कालावधीत कोणतेही उद्घाटन समारंभ अथवा आचारसंहितेच्या कक्षेत येणारे कार्यक्रम आयोजित करू नयेत, असेही स्पष्ट करण्यात आले. शासकीय वाहने मंत्र्यांसह कोणत्याही पदाधिकाऱ्यांना निवडणूक आचारसंहितेच्या अनुषंगाने वापरासाठी उपलब्ध करून देऊ नयेत, असेही निर्देश देण्यात आले.


मंत्री दौऱ्यांसाठी स्वतंत्र व्हिडिओ पथक

मंत्री अथवा इतर मान्यवरांच्या दौऱ्यांदरम्यान आवश्यक त्या बाबींचे चित्रीकरण व नोंदणी करण्यासाठी तहसीलदारांनी स्वतंत्र व्हिडिओ पथकाची नियुक्ती करावी, अशा सूचना देण्यात आल्या. हेलिपॅडचा वापर सर्व संबंधितांना नियम व उपलब्धतेनुसार समान पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या.


निवडणूक कालावधीत माध्यमांशी संबंधित कामकाजासाठी जिल्हा माहिती अधिकारी यांच्या समन्वयाने मीडिया कक्षाची स्थापना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच शासकीय कार्यालये व परिसरातील आचारसंहितेच्या अनुषंगाने असलेले पोस्टर, बॅनर आदी काढून त्याबाबतचा अहवाल निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.


तातडीच्या कामांसाठी आवश्यक प्रशासकीय मान्यता घेण्याचे निर्देश

निवडणूक कालावधीत तातडीच्या व अत्यंत महत्त्वाच्या कामांसाठी संबंधित विभागांनी आपल्या प्रशासकीय विभागाकडून आवश्यक त्या तांत्रिक व प्रशासकीय मान्यता घेऊनच कार्यवाही करावी, अशा सूचना देण्यात आल्या. तसेच शासकीय विश्रामगृहात कोणत्याही प्रकारच्या राजकीय बैठका होणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले.


निवडणूक बंदोबस्ताचे नियोजन

निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था तसेच सुरक्षा व्यवस्थेचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शहरी भागासाठी पोलीस आयुक्त कार्यालयाने, तर ग्रामीण भागासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाने संबंधित तालुका पोलीस ठाण्यांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात, असे निर्देश देण्यात आले.


प्रत्येक मतदारसंघासाठी निवडणूक बंदोबस्ताकरिता नियुक्त करण्यात येणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे निश्चित करून त्यानुसार आवश्यक नियोजन पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.


बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, उपजिल्हाधिकारी (महसूल) लक्ष्मण कसेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) सूर्यकांत भुजबळ, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त विना ज्ञानेश्वर पवार, सहायक पोलीस निरीक्षक कांचन राजेंद्र कानडे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आसिफ मुलाणी, मनपा प्रशासन अधिकारी मल्हारी माने, सोलापूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी सतीश कोपूरवाड उपस्थित होते.

***

To Top