'वर्दीचा सन्मान... तिरंग्याचा अभिमान !' देशसेवेचे 24 वर्षांचे व्रत पूर्ण करून परतलेल्या हवालदार विक्रम नाईकनवरे यांचा जन्मभूमीत भव्य गौरव !

shivrajya patra

पंढरपूर : देशासाठी आपल्या आयुष्यातील तब्बल 24 वर्षे 30 दिवस समर्पित करून, भारतीय सैन्य दलातून सन्मानपूर्वक सेवानिवृत्त झालेले येथील सुपुत्र हवालदार विक्रम राजाराम नाईकनवरे यांचे पंढरपुरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. 'वर्दीचा सन्मान... तिरंग्याचा अभिमान!' या ब्रीदवाक्याखाली आयोजित करण्यात आलेल्या या गौरव सोहळ्याने संपूर्ण पंढरपूरचे वातावरण देशभक्तीने भारावून गेले. 


06 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता पंढरपूर शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. पंढरपूर रेल्वे स्टेशनपासून स्टेशन रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि भक्ती मार्ग परिसरातून ही रॅली काढण्यात आली. यावेळी नागरिक, युवक, माजी सैनिक आणि मित्रपरिवार मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. 'भारत माता की जय!'... 'वंदे मातरम्!' च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला.


त्यानंतर गाडगेबाबा चौक येथील विराट मंगल कार्यालयात हवालदार विक्रम नाईकनवरे यांचा मान्यवर, माजी सैनिक, अधिकारी, मित्रपरिवार नागरिकांच्या उपस्थितीत विशेष सत्कार करण्यात आला. 


02 ऑगस्ट 2002 रोजी भारतीय सैन्य दलातील 'कोर ऑफ सिग्नल' मध्ये दाखल झालेल्या विक्रम नाईकनवरे यांनी तब्बल 24 वर्षे देशसेवा केली. सेवाकाळात त्यांनी देशाच्या विविध भागात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. पंजाबमध्ये अन्न पुरवठा निरीक्षक म्हणून काम करताना त्यांनी उल्लेखनीय सेवा बजावली. तसेच ड्रिल इन्स्ट्रक्टर आणि डब्ल्यू. टी. उस्ताद म्हणून जवानांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारीही त्यांनी प्रभावीपणे सांभाळली. 


हिमाचल प्रदेश, गोवा आणि पंजाब यांसह विविध ठिकाणी महत्त्वाच्या पदांवर काम करत त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवली कर्तव्य बजावले. विशेष म्हणजे, देशसेवा बजावत असतानाच त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. नव्याने सैन्यात दाखल होणारे रिक्रूट, अग्निवीर आणि ज्युनिअर लीडर यांना लष्करी प्रशिक्षण देण्यातही त्यांनी मोलाचे योगदान दिले. 



देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना पुढील पिढीतील जवान घडवण्याचे काम करणाऱ्या या सैनिकाचा पंढरपूरकरांनी केलेला सन्मान निश्चितच अभिमानास्पद ठरला. सत्काराला उत्तर देताना हवालदार विक्रम नाईकनवरे भावूक झाले.


देशसेवा करताना आपल्या कुटुंबीयांनी दिलेल्या साथीची आठवणही त्यांनी यावेळी आवर्जून काढली. "मी देशसेवा करत असताना माझ्या सर्व नातेवाईकांनी माझ्या घराकडे लक्ष दिले. मी सीमेवर काम करत असताना माझ्या नातेवाईकांनी, पाहुण्यांनी, मित्रमंडळींनी आणि संपूर्ण परिवाराने माझ्या कुटुंबाची काळजी घेतली. त्यांनी आपल्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता आभार व्यक्त केले.


या सोहळ्याचे आयोजन त्यांचे बंधू दीपक राजाराम नाईकनवरे, स्व. राजाराम नाईकनवरे प्रतिष्ठान व सामाजिक संस्था, संतपेठ पंढरपूर, तसेच पंढरपूर-मंगळवेढा तालुका माजी सैनिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने माजी सैनिक, अधिकारी, नागरिक आणि मित्रपरिवार उपस्थित होते. 


देशाच्या सीमेवर 24 वर्षे तिरंग्याची शान जपणाऱ्या या वीर सुपुत्राला पंढरपूरकरांनी दिलेला सन्मान म्हणजे केवळ एका सैनिकाचा गौरव नाही... तर संपूर्ण सैनिक वर्गाच्या त्यागाला आणि देशसेवेला दिलेली मानवंदना आहे! या शानदार सोहळ्याची स्नेहभोजनाने सांगता झाली. वर्दी उतरली, मात्र देशसेवेची भावना कायम राहणार आहे.

... चौकट 

... प्रत्येक घरात एक सैनिक निर्माण झाला पाहिजे : हवालदार विक्रम नाईकनवरे

आई-वडिलांची प्रेरणा आणि आजीच्या आशीर्वादामुळेच आपण देशसेवेचे हे खडतर कर्तव्य यशस्वीपणे पार पाडू शकलो, अशी कृतज्ञ भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील युवकांना एक महत्त्वाचे आवाहनही केले. "मी सर्व महाराष्ट्रातील युवकांना एक आवाहन आणि विनंती करतो की, प्रत्येक घरात एक सैनिक निर्माण झाला पाहिजे. जय हिंद!" असं आवाहन करत त्यांनी युवकांनी देशसेवेकडे वळण्याचे आवाहन केले.

To Top