नोकरी मागणारे नव्हे, नोकरी देणारे बना : डॉ. मिनाक्षी जगदाळे

shivrajya patra

इंदापूर महाविद्यालयात ‘स्टार्टअप आणि उद्योजकता विकास’ कार्यशाळा; महिला व तरुणांना आत्मनिर्भरतेचा संदेश

इंदापूर : “ कल्पकता, चिकाटी आणि योग्य नियोजनाची जोड दिल्यास घरातून सुरू केलेला छोटासा गृहउद्योगही भविष्यात मोठ्या ब्रँडचे रूप घेऊ शकतो, आजच्या गतिमान युगात केवळ पदवी संपादन करून नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा तरुणांनी आणि महिलांनी स्वतःचे उद्योग उभे करून नोकरी मागणारे नव्हे, तर नोकरी देणारे बनले पाहिजे.” असं प्रतिपादन प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ तथा इतिहास अभ्यासिका प्रा. डॉ. मिनाक्षी अमोल जगदाळे यांनी केले.


इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाच्या वतीने ‘साबण व अगरबत्ती निर्मितीसाठी स्टार्टअप आणि उद्योजकता विकास’ या विषयावर विशेष एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. मिनाक्षी जगदाळे बोलत होत्या.



कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन जी पाटील यांनी सर्वांना मार्गदर्शन करताना सांगितले की, उद्योजकता म्हणजे केवळ व्यवसाय करणे नाही तर आत्मप्रेरीत होऊन जिद्द आत्मविश्वास आणि अथक परिश्रमाच्या जोरावर समाजाच्या समस्या सोडवणे होय. देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देत युवा पिढीने आणि महिलांनी अधिक सक्षम आणि स्वावलंबी व्हावे, असेहीं तें म्हणाले.


महिलांनी केवळ ‘चूल आणि मूल’ या पारंपरिक चौकटीत न राहता आपल्या अंगभूत कौशल्याला व्यवसायाची जोड देत आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, असे आवाहन करताना डॉ. जगदाळे म्हणाल्या की, “आर्थिक स्वावलंबन हाच स्त्रीसन्मानाचा खरा पाया आहे. उद्योगाच्या माध्यमातून महिलांसमोर प्रगतीची नवी दारे खुली होऊ शकतात.”



व्यवसाय सुरू करताना मोठ्या भांडवलाची किंवा मोठ्या दुकानाची आवश्यकता नसून स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या कच्च्या मालाचा, नैसर्गिक घटकांचा आणि कौशल्याचा योग्य वापर करून दर्जेदार उत्पादने तयार करता येतात. उत्पादनाच्या गुणवत्तेबरोबरच त्याचे ब्रँडिंग, आकर्षक पॅकेजिंग आणि लेबलिंग यांनाही तितकेच महत्त्व असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून व्यवसायाला बाजारपेठ मिळवून देण्याचे तंत्रही कार्यशाळेत समजावून सांगण्यात आले. व्हॉट्सॲप बिझनेस, इन्स्टाग्राम, फेसबुक तसेच स्थानिक ई-कॉमर्स ग्रुप्सच्या माध्यमातून घरबसल्या थेट ग्राहकांपर्यंत उत्पादने पोहोचवता येतात, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.


व्यवसायातील नफा आणि मुद्दल यांची गल्लत न करता नफ्यातील काही हिस्सा व्यवसायाच्या पुनर्गुंतवणुकीसाठी राखून ठेवणे, दररोजच्या व्यवहारांची नोंद ठेवणे आणि ग्राहकांच्या प्रतिक्रियेनुसार उत्पादनात सातत्याने सुधारणा करणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले.


महिलांनी एकल व्यवसायाच्या मर्यादांवर मात करण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून संघटित होण्याचे आवाहन करण्यात आले. सामूहिक खरेदीमुळे कच्चा माल कमी दरात उपलब्ध होऊन उत्पादन खर्च घटतो आणि नफ्याचे प्रमाण वाढते, याकडेही लक्ष वेधण्यात आले.



दरम्यान, शासनाच्या मुद्रा योजना, स्टँड-अप इंडिया, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना तसेच महिलांसाठी उपलब्ध असलेल्या विविध सवलतींची माहिती घेऊन अचूक प्रकल्प अहवाल तयार करण्याचे आवाहन करण्यात आले.


कार्यशाळेस संस्थेचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. प्रशिक्षक डॉ. मन्सूर मौलवी यांनी विद्यार्थ्यांना व महिलांना साबण आणि अगरबत्ती निर्मितीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवले.


यावेळी सौ. सारिका शिरोळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे, उपप्राचार्य डॉ. एस. एस. वीर, समन्वयक डॉ. एम. पी. शिंदे, संयोजिका डॉ. जयश्री गटकूळ यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी व परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

***** शब्दांकन : संजय निंबाळकर.


“स्थानिक उत्पादनांना ब्रँड बनविण्याची ताकद तरुणाईच्या हातात”


“आपल्या आजूबाजूला उपलब्ध असलेल्या नैसर्गिक घटकांचा आणि स्थानिक कच्च्या मालाचा वापर करून कमी खर्चात दर्जेदार उत्पादने तयार करता येतात. स्थानिक उत्पादनांमध्ये नावीन्य आणून त्यांना मूल्यवर्धित स्वरूप दिल्यास मोठी बाजारपेठ निर्माण होऊ शकते. उत्पादनाचा दर्जा जितका महत्त्वाचा आहे, तितकेच त्याचे सादरीकरणही महत्त्वाचे आहे. आकर्षक ब्रँड, पर्यावरणपूरक पॅकेजिंग आणि प्रभावी लेबलिंगमुळे स्थानिक उत्पादनाला व्यावसायिक ओळख मिळते. 


आज डिजिटल माध्यमांमुळे मोठे दुकान न उघडताही घरबसल्या देशभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचणे शक्य आहे. त्यामुळे तरुणांनी आणि महिलांनी नोकरीच्या संधी शोधण्याबरोबरच स्वतः रोजगार निर्माण करण्याचा दृष्टिकोन स्वीकारावा, हा काळाचा संदेश आहे.” 

                           माजी सहकार राज्यमंत्री- हर्षवर्धन पाटील.

To Top