दुष्काळसदृश्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी जिल्हा प्रशासन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर !

shivrajya patra

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या उपस्थितीत बोरामणी इथं दुष्काळसदृश्य स्थितीची पाहणी


सोलापूर : पावसातील खंड तसेच अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात काही भागात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. दक्षिण तालुक्यातील बोरामणी इथं जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या उपस्थितीत दुष्काळसदृश्य परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात आला.


यावेळी बोरामणीसह दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही गावे तसेच अक्कलकोट तालुक्यातील गावांना भेटी देऊन तेथील परिस्थितीची पाहणी करण्यात आली. शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत पिकांची सद्यस्थिती, पावसातील खंड, जमिनीतील ओलावा, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता तसेच जनावरांसाठी चाऱ्याची परिस्थिती याबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली.



जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन सोयाबीन, ऊस आणि मका या पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. पावसाच्या अनियमिततेमुळे पिकांवर झालेला परिणाम, जमिनीतील ओलाव्याची स्थिती आणि आगामी काळातील संभाव्य अडचणी याबाबत शेतकऱ्यांकडून माहिती जाणून घेण्यात आली.


शेतकऱ्यांच्या अडचणींची वस्तुनिष्ठ माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवून शासनाच्या निर्णयानुसार पात्र शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असल्याचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे प्रत्यक्ष शेतपातळीवरील परिस्थितीचा आढावा घेऊन शासनाच्या मदतीसाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या दृष्टीने या पाहणीला महत्त्व प्राप्त झाले आहे.


या पाहणीप्रसंगी आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हा परिषद सदस्य नेताजी खंडागळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, प्रांताधिकारी सुमित शिंदे, तहसीलदार किरण जमदाडे, तालुका कृषी अधिकारी अवधूत मुळे, तहसीलदार विनायक मगर, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत मंगरूळे यांच्यासह महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.



कृषी व पशुसंवर्धन सभापती रामाप्पा चिवडशेट्टी, दक्षिण सोलापूर सभापती संदीप टेळे, उपसभापती सौ. वर्षा पटणे, अक्कलकोट पंचायत समिती सभापती सौ. रश्मी हिप्परगी, विकास बुळ्ळा, सिद्धाराम शिवमूर्ती, अप्पासाहेब किवडे यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समितीचे पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती.


पावसातील खंड आणि कमी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, त्यांच्या अडचणींची योग्य दखल घेतली जावी आणि शासनाच्या निकषांनुसार पात्र लाभार्थ्यांना आवश्यक ती मदत मिळावी, यासाठी प्रशासनाकडून प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे.

To Top