सैनिक टाकळीच्या विवेकसिंह पाटीलची राष्ट्रीय एनसीसी शिबिरात रौप्यपदकावर मोहोर

shivrajya patra

जजिंग डिस्टन्स अँड फील्ड सिग्नल्स’ मध्ये देशात द्वितीय क्रमांक; महाराष्ट्र एनसीसी डायरेक्टरेटचा गौरव


सैनिक टाकळी : नवी दिल्ली येथे झालेल्या एनसीसी राष्ट्रीय थलसेना कॅम्प (AITSC) 2026 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सैनिक टाकळीचा सुपुत्र आणि 05 महाराष्ट्र बटालियन एनसीसी, कोल्हापूरअंतर्गत सैनिकी प्रशिक्षण घेणाऱ्या ज्युनियर अंडर ऑफिसर (JUO) विवेकसिंह विजयाराणी विनोदसिंह पाटील (रामजी) याने दैदिप्यमान कामगिरी केली. ‘जजिंग डिस्टन्स अँड फील्ड सिग्नल्स’ या स्पर्धेत त्याने रौप्यपदक पटकावत देशात द्वितीय क्रमांक मिळविला. त्याच्या या यशामुळे महाराष्ट्र एनसीसी डायरेक्टरेटच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.



नवी दिल्ली इथं, 31 ऑगस्ट ते 11 सप्टेंबरदरम्यान पार पडलेल्या राष्ट्रीय थलसेना शिबिरात देशभरातील विविध राज्यांतील निवडक आणि गुणवंत एनसीसी कॅडेट्स सहभागी झाले होते. कठोर निवड प्रक्रिया, सातत्यपूर्ण सराव, शिस्त, नेतृत्वगुण आणि सैनिकी कौशल्यांची कसोटी पार करत विवेकसिंहने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशात द्वितीय क्रमांक मिळवत त्यानं आपल्या गुणवत्तेची ठळक छाप उमटविली.



या यशासाठी विवेकसिंहने दीर्घकाळ कठोर प्रशिक्षण घेतले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस येथे 30 दिवस, तर अमरावती येथे 40 दिवस झालेल्या राज्यस्तरीय थलसेना इंटरग्रुप सिलेक्शन कॅम्पमध्ये त्याने सातत्यपूर्ण सराव केला. या खडतर प्रशिक्षण आणि निवड प्रक्रियेनंतर त्याची राष्ट्रीय थलसेना कॅम्पसाठी अंतिम निवड झाली होती.



कसबा बावडा, कोल्हापूर येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये विवेकसिंह सध्या बी. टेक. तृतिय वर्षात शिक्षण घेत आहे. शिक्षणासोबतच तो 05 महाराष्ट्र बटालियन एनसीसी, कोल्हापूरअंतर्गत सैनिकी प्रशिक्षण घेत आहे. त्याला बटालियनचे सुभेदार मेजर, एनसीसी अधिकारी तसेच ऑन. लेफ्टनंट प्रा. डॉ. राहुल डी. महाजन यांचे मार्गदर्शन लाभले.


फुटबॉलमध्येही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व


विवेकसिंहने यापूर्वीही क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कोल्हापूर येथील महाराष्ट्र हायस्कूलचा विद्यार्थी असताना त्याने 03 वेळा माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शालेय तसेच सुब्रोतो मुखर्जी चषक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलं आहे. दिल्ली तसेच जम्मू-काश्मीर येथे झालेल्या स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याचा मान त्याला मिळाला होता.



क्रीडा क्षेत्रातील अनुभव, शिस्त, सातत्यपूर्ण सराव आणि सैनिकी प्रशिक्षणाच्या बळावर विवेकसिंहने आता एनसीसीच्या राष्ट्रीय व्यासपीठावर रौप्यपदकाची कमाई केली आहे. त्याच्या या यशाबद्दल सैनिक टाकळी, कोल्हापूर तसेच एनसीसी क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. 



राष्ट्रीय स्तरावर मिळविलेल्या विवेकसिंह कामगिरी आणि यशामुळे सैनिकी सेवेकडे वाटचाल करणाऱ्या ग्रामीण भागातील युवकांसाठीही प्रेरणादायी ठरली आहे.

To Top