अल्पवयीन मुलीचा विनयभंग; तरूणास शिक्षा

shivrajya patra

 
सोलापूर : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप न्यायालयात सिध्द झाल्यानं न्यायाधीश जे. जे. मोहिते यांनी आरोपी सौरभ संजय पाताळे या तरूणास IPC कलम 354 अंतर्गत 03 महिन्यांची कैद आणि 01 हजार रुपयांचा दंड, तसेच POCSO Act कलम 12 अंतर्गत 03 महिन्यांची कैदेसह 01 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. 


येथील एका नामवंत महाविद्यालयात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवून 03 महिन्यांची साधी कैदेसह 01 हजार रूपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. दोन्ही दंडाची रक्कम न भरल्यास प्रत्येकी 15 दिवसांची अतिरिक्त कैद भोगावी लागणार आहे. 


या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, 14 मार्च 2020 रोजी सकाळी 11.00 वा. अल्पवयीन मुलगी (वय 17 वर्षे 08 महिने) ही सातरस्ता परिसरातील महाविद्यालयात अकाऊंटचा पेपर देण्यासाठी गेली होती. पेपर संपल्यानंतर ती घरी परत न आल्याने तिच्या आई-वडिलांनी तिचा नातेवाईक व मैत्रिणींकडे शोध घेऊन तिच्याकडून माहिती घेतली असता, आरोपी सौरभ संजय पाताळे (वय 21 वर्ष, रा. घर क्र. 546 नॉर्थ कसबा, सोलापूर.) हा तिच्याशी कॉलेजमध्ये ओळख वाढवून तिच्याशी जवळीक साधत असल्याचे तसेच तिचा पाठलाग करून तिला त्रास देत असल्याचे निष्पन्न झाले.


या प्रकाराबाबत मुलीच्या आई-वडिलांनी तक्रार दिल्यानंतर आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन सदर बझार येथे भादंवि कलम 354 व POCSO Act कलम 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सपोनि चानकोटी यांनी पूर्ण करून न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते. 


तत्पूर्वी तपासादरम्यान संबंधित साक्षीदारांचे जबाब, उपलब्ध कागदपत्रे व आणि इतर पुरावे संकलित करून तपास पूर्ण करून तपास अधिकारी सपोनि चानकोटी यांच्याकडून न्यायालयासमोर दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. 


प्रकरणातील जबाब व तपास कागदपत्रांमध्ये असलेल्या तथ्यांच्या आधारे न्यायाधीश जे. जे. मोहिते यांनी हा निकाल दिला. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्रीमती कविता बागल यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. 


कोर्ट पैरवी म्हणून पोहवा प्यारन नदाफ आणि दोषसिद्धी कक्षाकडील सपोनि राजेश डाकेवाड, पोउपनि रामु मुददे, मपोहवा मैंदाड यांनी कामकाज पाहिले. या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या प्रभावी तपासामुळे व न्यायालयीन प्रक्रियेत पुरावे योग्य प्रकारे सादर केल्यामुळे आरोपीस शिक्षा झाली.

To Top