बंदीवासातील आरोपीचा इच्छा-मृत्यू मिळण्यासाठी अर्ज; न्यायालयानं केला दफ्तरी दाखल

shivrajya patra

सोलापूर : हत्येच्या आरोपात गेली 16 महिने कारागृहात बंदीवासात असलेल्या आरोपीनं  इच्छा-मृत्यू मिळण्यासाठी केला जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केलाय. सासऱ्याचा खून केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. मंगेश देविदास सलगर (रा. कोळेगांव) असं इच्छा मरणासाठी अर्ज केलेल्या आरोपीचं नाव असून अवयव दान होण्यासाठी न्यायालयात अर्ज केला ! 

मोहोळ तालुक्यातील राम हिंगणी इथं पती-पत्नीच्या वादातून सासरे बापूराव तुळशीराम माशाळ यांचा चाकूने मारून खून केला तर सासू आशा माशाळ, मेहुणा अभिषेक  याला गंभीर जखमी केल्याच्या आरोपावरून मंगेश देविदास सलगर (रा. कोळेगाव ता. मोहोळ) याला मोहोळ पोलिसांनी गतवर्षी दि. 28 एप्रिल रोजी अटक केली. ही घटना त्याच दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती.

मोहोळ पोलिसांनी आरोपी मंगेश सलगर याच्याविरूध्द दाखल गुन्ह्याचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोप पत्रक पाठवले. सोलापूर सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरु आहे. 

आरोपी मंगेश सलगर व त्याची पत्नी यांनी मोहोळ न्यायालय, सोलापूर न्यायालय, कौटुंबिक न्यायालयात परस्परांविरुध्द दिवाणी व फौजदारी खटले दाखल केले आहेत. पती- पत्नीच्या वादामुळे आरोपीची पत्नी माहेरी आई-वडिलांबरोबर राहत होती. 

घटनेदिवशी आरोपीचा सासरा बापुराव माशाळ, सासू आशा ही घरातील पोर्चमध्ये तर त्याची त्याची पत्नी निशा ही घरामध्ये तर मेव्हणा अभिषेक घरालगत असलेल्या खोलीत झोपलेले असताना, मंगेश सलगर तिथं गेला आणि चाकूने सासऱ्यावर हल्ला करुन त्याचा खून केला, सोडवा-सोडवी करणाऱ्या सासू व मेहुण्यावर चाकूने हल्ला करुन त्यांना गंभीर जखमी केले. 

या आरोपावरुन मोहोळ पोलिसांनी आरोपीविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हा खटला, गेल्या 19 ऑगस्ट रोजी रोजी सोलापूर सत्र न्यायालयात सुनावणीसाठी नेमण्यात आला होता. त्याच दिवशी आरोपी मंगेशनं न्यायाधिशांकडे लेखी अर्ज दिला.  


“गेली 16 महिने मी कारागृहात सजा भोगत आहे. परंतु आता कारागृहात सजा भोगण्याची अथवा दिवस काढण्याची माझी शारिरीक व मानसिक स्थिती राहिली नाही. मी पूर्णपणे खचलो आहे. उलट काहीतरी चांगले काम माझ्याकडून होण्याची माझी आशा आहे. मला इच्छा मृत्यू घ्यावा व माझे सर्व अवयव दान करण्यात यावे, जेणेकरुन अनेकांना जीवदान मिळेल, नवसंजीवनी मिळेल, जोपर्यंत माझी न्याय मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत मला आमरण उपोषणाची परवानगी मिळावी. माझ्या उपोषणादरम्यान अन्य कैद्याकडून मानसिक त्रास, शिवीगाळ अथवा मारहाण होऊ नये, यासाठी सुरक्षा द्यावी, ही विनंती ” या मजकूराचा अर्ज न्यायालयाकडे केला.  

न्यायाधिशांनी आरोपीच्या अर्जावर सरकारी वकील व कारागृह अधिकाऱ्यांचे म्हणणे मागवले. त्या अर्जाच्या सुनावणीदरम्यान आरोपीचे वकील व सरकारी वकील यांचे म्हणणे ऐकले. आरोपीची  त्या अर्जातील विनंती आणि सदरचा खून खटला या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, असे मत व्यक्त करुन आरोपीचा अर्ज दप्तरी दाखल (खारीज) करुन जेल अधिक्षक यांना आरोपीचं समुपदेशन करावे आणि गरज पडल्यास आरोपीला वैद्यकीय मदत द्यावी, असे आदेश दिले. 

या अर्जाच्या सुनावणी प्रकरणी आरोपीतर्फे ॲड. धनंजय माने, ॲड. जयदीप माने तर सरकार पक्षातर्फे ॲड. पी. ए. जन्नु यांनी काम पाहिले.  

खूनाच्या आरोपात कारागृहात असलेल्या आरोपीनं देहदान आणि अवयव दानाची परवानगी मिळण्याचा न्यायालयाकडे अर्ज करण्याची ही न्यायालयीन इतिहासातील पहिलीच घटना आहे.

*****


To Top