सोलापूर : ग्रामीण भागातील अरमान शेख या खेळाडूनं राष्ट्रीय स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी करून कुमठे गावाचे, सोलापूर जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करावं, अशी अपेक्षा जयकुमार माने यांनी व्यक्त केली.
रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवण येथे नुकत्याच पार पडलेल्या ४० व्या महाराष्ट्र राज्य कनिष्ठ अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत कुमठे प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयाचा खेळाडू व ब्रह्म स्पोर्ट्स क्लबचा विद्यार्थी अरमान अशपाक शेख यानं उल्लेखनीय कामगिरी करत १८ वर्षांखालील ५ किलोमीटर चालण्याच्या (रेस वॉक) स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. या यशामुळे अरमानची राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
अरमान शेख च्या यशाबद्दल सत्कार करून त्याला राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी जयकुमार माने बोलत होते.
यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य विश्वस्त व नगरसेवक जयकुमार माने, ब्रह्मदेवदादा माने सहकारी बँकेचे संचालक शावरप्पा वाघमारे, कुमठे कनिष्ठ महाविद्यालयाचे विभागप्रमुख प्रा. संजय जाधव तसेच ब्रह्म स्पोर्ट्स अकॅडमीचे मार्गदर्शक विक्रम पवार उपस्थित होते.
केरळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत अरमान शेख महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन दिलीपराव माने, विश्वस्त स्वाती माने आणि प्राचार्य अंबादास रेडे यांनी अरमान चं अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
ग्रामीण भागातून आलेल्या अरमानच्या या यशामुळे कुमठे परिसरातील क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालं असून, राष्ट्रीय स्तरावरही तो निश्चितच चमकदार कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
*****
