'कृष्णामाई मला माफ कर !' 'कृष्णा नदीला खुले पत्र'

shivrajya patra

कृष्णामाई,

तू उगमस्थानापासून ते सागराला जाऊन मिळेपर्यंत आमच्या अनेक पिढ्यांना त्यांचं जीवन जगविण्यासाठी स्वच्छ आणि निर्मळ पाणी दिलेस. त्यांचे भरण-पोषण व्हावं, म्हणून शेतशिवारातील पिके जगवलीस. खऱ्या अर्थाने आमचे जीवन जगविण्यासाठी तू न थकता, न थांबता सतत अव्याहतपणे प्रवाहित राहिलीस. कृष्णामाई, तुझे हे ऋण कसे फेडू ! हे ऋण माझ्या अंगावर आहेच, पण त्याचबरोबर कृष्णामाई, तुझी आज माफीही मागायची आहे, 'कृष्णामाई मला माफ कर !' कारण तुझी माफी मागण्याची वेळ माझ्यावर का आली?


त्याचे असे झाले, कृष्णामाई मी अलिकडेच तुझ्या नदीपात्राच्या काठावर अनेक ठिकाणी गेलो. तिथलं दृश्य पाहून मन हेलावून गेलं. वाई येथील कृष्णा नदीच्या काठावर गेलो होतो, तेव्हा तिथे अनेक महिला धुणे धुण्यासाठी नदीपात्रात जात होत्या.



या धुण्यामुळे नदीपात्रातील पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाले आहे. वाई येथे लोकांनी वापरलेली जुनी पुरानी कपडे नदीपात्रात टाकल्याने पाणी दुर्गंधीयुक्त झाले आहे. त्याचप्रमाणे वाई शहरातील सर्व गटारांचे अतिशय घाणेरडे, दूषित, दुर्गंधीयुक्त पाणी थेट तुझ्या पात्रात सोडण्यात येत आहे. मी हे केवळ बघण्याशिवाय काहीही करु शकत नाही. कृष्णामाई, माझे काहीच चालत नाही. माझेच काय, तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आणि स्थानिक प्रशासनाचेही काहीच चालत नाही.


कृष्णामाई, तुला वर्षातून एकदा एकच दिवस आम्ही मनोभावे पूजतो आणि उरलेले 364 दिवस रात्रं-दिवस तुझ्या पात्रात थेट घाण पाणी बिनधास्त सोडतो. याचं आम्हाला काहीच वाटत नाही. ज्या कृष्णामाईच्या पात्रातील पाणी आम्ही पितो, त्याच पात्रात आम्ही घाण पाणी सोडतो, याचे आम्हाला सोयर-सुतकही नाही, याचीच कमालीची शरम वाटते. म्हणून 'कृष्णामाई मला माफ कर!'



संगम माहुली येथे मंदिरात देवपूजा केल्यानंतर अनेक भाविक मोठ्या प्रमाणावर निर्माल्य नदीपात्रात टाकत असल्याने येथील नदीपात्र प्रदूषित झाले आहे. तसेच येथे प्लास्टिकच्या बाटल्या आणि इतर विविध प्रकारचा घनकचरा मोठ्या प्रमाणावर टाकल्याने कृष्णा नदीचे पात्र प्रदूषित झाले आहे. म्हणून 'कृष्णामाई मला माफ कर!'

कृष्णामाई, पुढे वडगांव येथील तुझ्या पात्रात साखर कारखान्याचे मळी-मिश्रित रासायनिक दुर्गंधीयुक्त पाणी थेट सोडले जात असल्याने येथेही तुझे पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झालं आहे. त्यानंतर बोरगांव येथील रामलिंग बेटाजवळील पात्रात मोठ्या प्रमाणावर नदीपात्राचे प्रदूषण झाले असून, विशिष्ट प्रकारच्या जिवाणूंमुळे तुझ्या पाण्याचा रंग गडद हिरवा झाला आहे. म्हणून 'कृष्णामाई मला माफ कर!'

                                     (शिवभार : छायाचित्र - सकाळ)


आमनापूर येथील गावचे सांडपाणी तर थेट तुझ्या पात्रात सोडले असल्याने येथे विशिष्ट प्रकारचा फेस दिसून येतो आणि पाणी दुर्गंधीने प्रदूषित झाले आहे. म्हणून 'कृष्णामाई मला माफ कर!' एवढेच नव्हे, तर आता सांगलीचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला असला तरी मूळ शहराची सुरुवात ज्या गावापासून झाली, त्या हरिपूर गावात मुख्य रोडवरील गुळवणी महाराजांच्या मठाजवळील पात्रात उतरल्यावर हे नदीचे पाणी आहे की गटाराचे पाणी आहे, असा केविलवाणा प्रश्न मला पडतो. इतक्या मोठ्या प्रमाणावर कृष्णामाई तुझे पाणी प्रदूषित झाले आहे. म्हणून 'कृष्णामाई मला माफ कर !'

कृष्णामाई तुझे पाणी प्रदूषण रोखण्यासाठी शासकीय पातळीवर, स्थानिक प्रशासनाकडून आणि सामाजिक संस्थांद्वारे विविध महत्त्वपूर्ण प्रयत्न केले जात आहेत. पण हे प्रयत्न अतिशय तोकडे आहेत आणि प्रदूषण करणारी विघातक यंत्रणा मात्र मोठ्या प्रमाणावर सातत्याने, दिवसरात्र अखंडपणे प्रदूषण करत आहे. यासाठी मराठीत एक म्हण आहे -'न्हाणीला बोळा आणि दरवाजा मोकळा!' अगदी तसेच काहीसे झाले आहे. म्हणून 'कृष्णामाई मला माफ कर!'



कृष्णामाई, तुझ्या पात्रात सोडल्या जाणाऱ्या घाण पाण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न आणि उपाययोजना सुरु आहेत. शासकीय स्तरावर, तुझ्या काठावर वसलेल्या गावांतील सांडपाणी - मैलापाणी थेट नदीत मिसळू नये, यासाठी युद्धपातळीवर कृती आराखडा केला आहे, पण तो बरेच दिवस कागदावरच शाईच्या माध्यमातून पडून आहे, प्रत्यक्षात जमिनीवर उतरलेला नाही. म्हणून 'कृष्णामाई मला माफ कर!'

तुझ्या पुनरुज्जीवनासाठी आणि प्रदूषणाची केंद्रे शोधण्यासाठी विशेष सखोल सर्वेक्षण केले जात असून, ठोस व्यवस्थापन आराखडाही तयार करुन ठेवला आहे, पण तोही कागदावरच आहे. म्हणून 'कृष्णामाई मला माफ कर!'



शून्य द्रव विसर्जन (Zero Liquid Discharge):- म्हणजे पर्यावरणात एक थेंबही दूषित पाणी न सोडता, सर्व कारखाने किंवा प्रकल्पाच्या आतच सांडपाण्याचा तिथेच पुनर्वापर करणे. ही महत्त्वाची भूमिका घेतली जाऊ शकते, पण इथेही आमच्या पदरी अपयशच आलं आहे. कृष्णामाई, तू आम्हाला तुझ्या निखळ पाण्याने आमचे शरीर आंघोळीच्या माध्यमातून स्वच्छ करतेस पण आम्ही कपाळकरंटे तुझं प्रदूषित झालेलं नदीपात्र पूर्णतः स्वच्छ करु शकत नाही. हा एक मात्र खरे की, कृष्णामाई तू महाराष्ट्र राज्यात उगम पावतेस तेच तु न्यूझीलंड किंवा युरोप या अनुशासन, स्वंयशिस्त पाळत असलेल्या देशात जर उगम पावली असतीस-प्रवाहित राहिली असतीस तर जराही प्रदूषित झाली नसतीस हे खेदाने म्हणावे लागते, म्हणून 'कृष्णामाई मला माफ कर !'

तुझे प्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नावाचे मोठे कार्यालय शासनाने उभे केलं आहे, त्यांच्या दिमतीला मोठी इमारत, यंत्रणा आणि अनेक प्रकारच्या सोयी-सुविधा आहेत. परंतु तुझे प्रदूषण रोखण्यासाठी या कार्यालयाने एकदाही सक्तीने उपाययोजना केल्याचे ऐकिवात नाही. म्हणून 'कृष्णामाई मला माफ कर!'

तुझ्या काठच्या साखर कारखान्यांना आणि रासायनिक कंपन्यांना त्यांचे दूषित पाणी नदीत न सोडता त्यावर प्रक्रिया करुन पुनर्वापर करण्याची सक्ती करण्यासाठी कायद्याने प्रतिबंध घातला आहे. पण इथेही अपयशच पदरी आले आहे, कारण कायदा कायद्याच्या पुस्तकातच शाईच्या माध्यमातून काळ्याकुट्ट अक्षरात बंद आहे आणि कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा डोळ्यांवर पट्टी बांधून गांधारी बनून राहिली आहे. म्हणून 'कृष्णामाई मला माफ कर!'


तुझे सांडपाणी शुद्ध करण्यासाठी मोठ्या नाल्यांचे दूषित पाणी पात्रात जाण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया करण्यासाठी नवीन शुद्धीकरण प्रकल्प उभारले गेले आहेत, परंतु येथेही अपयशच आले आहे. म्हणून 'कृष्णामाई मला माफ कर!'


तुझ्या पात्रातील गाळ काढणे, प्रवाह सुधारणे आणि जलपर्णी काढण्याचे काम हाती घेतले जाते, ज्यामुळे पाण्याचा प्रवाह गतिमान राहून ऑक्सिजनची पातळी टिकून राहते. या योजनाही अनेक वेळा केल्या जातात, परंतु त्यांचा लाभ मोठ्या प्रमाणावर होत नाही. म्हणून 'कृष्णामाई मला माफ कर!'


तुझ्या काठांचे वनीकरण व्हावे, पाण्याचा प्रवाह नैसर्गिकरित्या शुद्ध व्हावा आणि शेतीतील रासायनिक खतांचे पाणी थेट नदीत वाहून जाऊ नये म्हणून काठावर मोठ्या प्रमाणावर झाडे लावणे गरजेचे आहे. परंतु या योजना शासनाला आवडत नाहीत. निवडणुका जवळ आल्या तरच अशा योजना त्यांना आठवतात. प्रचारात या योजना कागदावर रंगीबेरंगी शब्दात शोभून दिसतात, नेतेमंडळी या योजना बेंबीच्या देठापासून ओरडून सांगतात, परंतु निवडून आल्यानंतर तेही विसरतात आणि ऐकणारे लोकही विसरतात. आणि या योजना कागदावरच राहतात. कृष्णामाई, तू कित्येक वर्षांपासून स्वच्छ होण्यासाठी वाट पाहत आहेस, पण आम्ही तुला स्वच्छ करु शकत नाही. म्हणून 'कृष्णामाई मला माफ कर!'



स्थानिक आणि सामाजिक पातळीवर 'सांडपाणी मुक्त गाव' अभियान, ग्रामपंचायतींमध्ये सांडपाण्याच्या विल्हेवाटीसाठी 'शोषखड्डे' आणि लहान शुद्धीकरण यंत्रणा उभारण्यावर भर देण्यासाठी अनेक जण कार्यरत आहेत, परंतु हे सर्व कार्य कृष्णामाई महाभंयकर प्रदूषणाच्या विळख्यात पडलेल्या प्रमाणात फारच तोकडे पडत आहे. म्हणून 'कृष्णामाई मला माफ कर!'


कृष्णामाई तुझ्या पात्रात धार्मिक साहित्यांचे विसर्जन न करता यासाठी स्वतंत्र व्यवस्था करणे आवश्यक आहे. सण-उत्सवांच्या काळात मूर्ती आणि निर्माल्य पात्रात टाकण्यास बंदी घालून विसर्जनासाठी कृत्रिम टाक्यांची सोय केली जात आहे. यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती, आंदोलने आणि जनजागृती फेऱ्या काढल्या जात आहेत. तुझे पात्र पूर्णपणे प्रदूषणमुक्त करण्यासाठी केवळ सरकारी निधीवर अवलंबून न राहता, नदीकाठच्या कारखान्यांवर कडक कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे आणि प्रत्येक नागरिकाने नदीत कचरा न टाकण्याची स्वयं-शिस्त, अनुशासन बाळगणे गरजेचे आहे. परंतु आम्ही स्वयं-शिस्त, अनुशासन पाळत नाही.


आम्ही कृष्णामाई तुझी मनोभावे डोळे मिटून पूजन करतो. आणि तुला प्रदूषित ही करतो. ही परस्पर विरोधी कृती आमच्या ध्यानातच येत नाही. कृष्णामाई, आम्हा नदी प्रदूषण करणाऱ्या लोकांना दोन्ही दंडाला धरुन कुणीतरी गदागदा हलवून जागं केलं पाहिजे, ताळ्यावर आणलं पाहिजे. भानावर आणलं पाहिजे. नाहीतर कृष्णामाई तुझे स्वच्छ आणि निर्मळ पाणी येणाऱ्या पिढ्यांना मिळणारच नाही. हे करण्यासाठी देखील धाडस केले पाहिजे. परंतु कृष्णामाई हे देखील धाडस आमच्याकडे नाही म्हणून 'कृष्णामाई मला माफ कर! कृष्णामाई खरंच मला माफ कर !'

शनिवार, 12 सप्टेंबर, 2026, सांगली.

आपला स्नेहांकित,
शितल मिराबाई-विठ्ठल खाडे,
शहर-जिल्हा-उपाध्यक्ष,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार,
सांगली.
संपर्क -9403573150
ईमेल आयडी - shitalkhade33@gmail.com

To Top