टेक्स्टाईल उद्योगाला नवसंजीवनी देण्याची मोदींची ग्वाही
नवी दिल्ली/सोलापूर : राष्ट्रीय हातमाग दिनाच्या औचित्याने राज्यसभा खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची प्रधानमंत्री निवासस्थानी भेट घेऊन सोलापूरची जागतिक ओळख असलेल्या हातमाग परंपरेचे प्रतीक मानली जाणारी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची प्रतिमा विणलेली विशेष सोलापुरी चादर भेट दिली. या आगळ्यावेगळ्या भेटीने सोलापूरच्या हातमाग उद्योगाची परंपरा, कौशल्य आणि सांस्कृतिक वैभवाला राष्ट्रीय स्तरावर विशेष अधोरेखित करण्यात आले.
एनडीएच्या नवनिर्वाचित राज्यसभा आणि लोकसभा खासदारांसाठी आयोजित विशेष अल्पोपहार कार्यक्रमात डॉ. ज्योती वाघमारे यांनी प्रधानमंत्र्यांना ही अनोखी भेट सुपूर्द केली. सोलापुरी चादरीवरील स्वतःची प्रतिमा पाहून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अप्रतिम कलाकृतीचे आणि सोलापूरच्या हातमाग परंपरेचे मनापासून कौतुक केले.
सोलापूरच्या विणकरांनी जपलेले कौशल्य हे देशाची अमूल्य परंपरा असल्याचे सांगत, सोलापूरच्या टेक्स्टाईल उद्योगाला नवउर्जा देण्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक पावले उचलेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. 
यावेळी खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी सोलापुरी चादरीचे आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डिंग करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष धोरण आखावं, अशी आग्रही मागणी केली.
सोलापुरी चादरीला जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाल्यास सोलापूरच्या वस्त्रोद्योगाला नवी चालना मिळेल, हजारो हातमाग कामगार, विणकर, लघुउद्योजक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबांचे आर्थिक जीवनमान उंचावेल, असे त्यांनी प्रधानमंत्री यांना सांगितले. 
सोलापुरी चादर हे केवळ एक उत्पादन नसून सोलापूरच्या अस्मितेचा आणि श्रमसंस्कृतीचा जागतिक ब्रँड आहे, असेही त्यांनी नमूद केले संवादादरम्यान डॉ. वाघमारे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत इंग्रजी विषयात पीएच.डी. पूर्ण केल्याचा संघर्षमय प्रवास प्रधानमंत्र्यांसमोर मांडला. 
गरीब कुटुंबातील आणि आंबेडकरी चळवळीतील एका मागास मुलीला शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यसभेवर पाठवून देशसेवेची संधी दिली, याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच आपण राहत असलेल्या भागाचे नावही मोदी परिसर असल्याचा रंजक उल्लेख त्यांनी यावेळी केला. 
डॉ. वाघमारे यांच्या संघर्षाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौतुक करत त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रतीही सद्भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस नितीन नवीन तसेच एनडीएचे सर्व नवनिर्वाचित खासदार उपस्थित होते.
.... चौकट
सोलापुरी चादरला जागतिक दर्जाची ओळख मिळवून देणे, ही माझी प्राथमिकता !
शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य, कष्टकरी, वंचित आणि कामगारांच्या विकासासाठी अधिक ताकदीने काम करत राहणार आहे.
सोलापूरच्या हातमाग आणि टेक्स्टाईल उद्योगाला नवसंजीवनी मिळावी, प्रत्येक विणकराच्या हाताला काम मिळावे आणि सोलापूर पुन्हा वस्त्रोद्योगाची राजधानी म्हणून देशभरात उभे राहावे, यासाठी मी संसदेत आणि केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करणार आहे. सोलापुरी चादरला जागतिक दर्जाची ओळख मिळवून देणे, ही माझी प्राथमिकता आहे.
खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे.
