सह्याद्री फाउंडेशनचा ‘एक राखी सैनिक बांधवांसाठी’ उपक्रम; विद्यार्थिनींनी पाठविल्या सीमेवरील जवानांसाठी राख्या

shivrajya patra

सोलापूर : सह्याद्री फाउंडेशनतर्फे रक्षाबंधनाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या ‘एक राखी सैनिक बांधवांसाठी’ या उपक्रमाला सोलापूर परिसरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थिनींनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या राख्या सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिक बांधवांसाठी पाठविण्यात आल्या.

विशेष म्हणजे, सह्याद्री फाउंडेशनतर्फे गेल्या पाच वर्षांपासून दरवर्षी सातत्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला दरवर्षी विद्यार्थिनी व शाळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, वर्षागणिक सहभाग वाढत आहे. यंदाही विविध शाळांतील विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने राख्या तयार करून सैनिक बांधवांप्रती आपले प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली.

विद्यार्थिनींकडून संकलित करण्यात आलेल्या सर्व राख्या 15 व्या बटालियन ‘द मराठा लाईट इन्फंट्री’ तुकडीकडे सुपूर्द करण्यात आल्या. या राख्या बटालियनमार्फत सीमेवर तैनात असलेल्या सैनिक बांधवांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत.

यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्यचक्राने सन्मानित नायब सुभेदार विजयकुमार यादव आणि जवान निलेश लोंढे यांच्याकडे सह्याद्री फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थिनींनी बनविलेल्या राख्या सुपूर्द करण्यात आल्या.

याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे, यशवंत खंडागळे, सह्याद्री फाउंडेशनच्या सचिव प्रतिभा खंडागळे, मंजुश्री रोकडे, सुजाता गोरे, सायली उरीट आदी उपस्थित होते. सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिक बांधवांप्रती प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सह्याद्री फाउंडेशनतर्फे हा उपक्रम राबविण्यात आला.

... चौकट

विद्यार्थ्यांच्या मनात,... सैनिकांप्रती आदराची भावना रुजावी हा सह्याद्री फाउंडेशनचा उद्देश 

“गेल्या पाच वर्षांपासून आम्ही सातत्याने ‘एक राखी सैनिक बांधवांसाठी’ हा उपक्रम राबवत आहोत. दरवर्षी विद्यार्थी आणि शाळांकडून मिळणारा वाढता प्रतिसाद आम्हाला प्रेरणा देतो. आपले सैनिक कुटुंबापासून दूर राहून सीमेवर अहोरात्र देशाचे रक्षण करतात. विद्यार्थिनींनी स्वतःच्या हाताने बनवलेली राखी ही केवळ राखी नसून सैनिक बांधवांप्रती असलेल्या प्रेम, आदर आणि कृतज्ञतेचे प्रतीक आहे. अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेम, देशसेवा आणि सैनिकांप्रती आदराची भावना रुजावी, हाच सह्याद्री फाउंडेशनचा उद्देश आहे.”

नेताजी खंडागळे, 

सदस्य - जिल्हा परिषद, सोलापूर

अध्यक्ष - सह्याद्री फाउंडेशन.

*****

.... चौकट

उपक्रमात या शाळांचा होता सहभाग !

जिल्हा परिषद मुलींची शाळा कुंभारी,

✨ जिल्हा परिषद शाळा बोरामणी,

✨ जिल्हा परिषद शाळा वडजी, 

✨ जिल्हा परिषद शाळा गंगेवाडी, 

✨ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संगदरी, 

✨ जिल्हा परिषद शाळा ऊळेवाडी, 

✨ ब्रह्मनाथ विद्यालय मुळेगांव, 

✨ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदिरानगर कासेगांव, 

✨ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासेगांव, 

✨ जिल्हा परिषद शाळा वरळेगांव, 

✨ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बक्षी हिप्परगे, 

✨ जिल्हा परिषद शाळा ऊळेगांव, 

✨ शारदा निकेतन विद्यालय, 

✨ स्प्रिंगफील्ड प्री-स्कूल ऊळेगांव 

आणि 

✨ ग्लोबल इंग्लिश स्कूल बोरामणी. 

*****

To Top