सोलापूर : 'वारसा वाचवा' चळवळीअंतर्गत बौद्ध पुरातत्वीय वारशाचे संवर्धन आणि दीक्षाभूमीच्या सर्वांगीण विकासासाठी बुध्दिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीने गुरुवारी, 20 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय (जुने) प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनात भारत मुक्ति मोर्चा, भारतीय विद्यार्थी मोर्चा चे पदाधिकारी-कार्यकर्ते सहभागी झाले होते, दरम्यान राष्ट्रपतींसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडं निवेदन देण्यात आले. 
बुध्दिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, भारत मुक्ति मोर्चा आणि भारतीय विद्यार्थी मोर्चा च्या संयुक्त विद्यमाने 04 टप्प्यांमध्ये EVM हटाव, 'वारसा वाचवा' चळवळीअंतर्गत बौद्ध पुरातत्वीय वारशाचे संवर्धन आणि दीक्षाभूमीच्या सर्वांगीण विकासासाठी देशव्यापी चळवळ सुरु आहे. धरणे आंदोलनाच्यावेळी 'EVM हटाव, देश बचाव' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी बुध्दिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, भारत मुक्ति मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सनाच्या कार्य पद्धतीवर बोट ठेवत NEET, CET सारख्या परिक्षात झालेले घोटाळे अधोरेखित केले.
माता कचरी यांची 16.5 एकर जमीन आणि कापूस संशोधन संस्थेची 3.5 एकर जमीन, ज्याचा खटला नागपूर उच्च न्यायालयात सुरू आहे, अशी एकूण 20 एकर जमीन दीक्षाभूमीच्या सर्वांगीण विकासासाठी कायदेशीर प्रक्रियेद्वारे हस्तांतरित केली जावी, अशी आग्रही भूमिका यावेळी मांडण्यात आली.
नागपूरमधील बौद्ध काळातील आदम स्तूप आणि भंडारा जिल्ह्यातील पावनी स्तूप हे जीर्ण अवस्थेत आहेत, तिथे शेती सुरू आहे, पावनी स्तूपावर एक मंदिर बांधण्यात आले आहे आणि देशभरात अशा अनेक बौद्ध वारसा स्थळांच्या ब्राह्मणीकरणाचं काम सुरू आहे, परंतु भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग या बौद्ध वारसा स्थळांच्या संवर्धनाकडे अजिबात लक्ष देत नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
यावेळी बुध्दीस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, भारतीय विद्यार्थी मोर्चा यांचे कार्यकर्ते आणि समाजातील हितचिंतक, समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
... चौकट
04 टप्प्यात आंदोलन !
या आंदोलनाच्या पहिला टप्प्यात, 17 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महामहिम राष्ट्रपती, राज्यपाल आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे महासंचालक यांना निवेदन सादर करण्यात आले. दुसरा टप्प्यात गुरुवारी, 20 ऑगस्ट रोजी देशातील प्रत्येक जिल्हा मुख्यालयासमोर धरणे आंदोलने करण्यात आली.
तिसरा टप्प्यात येत्या, 22 सप्टेंबर रोजी जिल्हा मुख्यालयात निदर्शने करण्याचं बुद्धीष्ट इंटरनॅशनल नेटवर्कचं नियोजन आहे, तर चौथ्या टप्प्यात 19 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय स्तरावरील बैठक नागपूर येथे होणार आहे.
****
... चौकट
आंदोलनाच्या प्रमुख मागण्या :
1) दीक्षाभूमीच्या सर्वांगीण विकासासाठी माता कचरीची 16.5 एकर जमीन आणि कापूस संशोधन संस्थेची 3.5 एकर जमीन हस्तांतरित करणे.
2) बौद्ध गया मंदिर अधिनियम 1949 रद्द करणे!
3) नागपूरमध्ये आंतरराष्ट्रीय बौद्ध आणि पाली विद्यापीठाची स्थापना करावी.
4) भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून नागपूरच्या आदम स्तूपाचे जतन न केल्याच्या निषेधार्थ!
5) भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून भंडारा जिल्ह्यातील पावनी स्तूपाचे जतन न केल्याच्या निषेध !
*****
--- चौकट
केंद्र आणि राज्य शासनाच्या शैक्षणिक धोरणाविरोधात भारतीय विद्यार्थी मोर्चा व भारत मुक्ती मोर्चाच्या धरणे प्रदर्शन आंदोलनातील या आहेत मागण्या !
1) ईव्हीएमच्या माध्यमातुन होणा-या निवडणुका या पारदर्शक पध्दतीने व विश्वसनतेच्या निकषावर घेण्यासाठी निवडणुक प्रक्रियेत सुधारणा करण्यात याव्यात.
2) नीट पेपर फुटी प्रकरणात केवळ मंत्री महोदयांनी राजीनामा देऊन भागणार नाही:तर सदर प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी केली जावी.
3) जंतर-मंतर वर विद्यार्थ्यांवर केलेल्या जीवघेण्या मारहाणीची नि:ष्पक्षपाती चौकशी व्हायला हवी.
4) वारंवार होणारी पेपरफुटी तात्काळ थांबायला हवी.
5) शिक्षण संस्थांचे खाजगीकरण थांबवून खाजगी क्षेत्रातही आरक्षण लागू करायला हवे.
6) राष्ट्रीय शिक्षण नितीत विद्यार्थी हित लक्षात घेऊन बदल करण्यात यावा.
7) राष्ट्रीय परीक्षा समितीची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी.
8) 2011 पूर्वी नोकरीस लागलेल्या शिक्षकांचीच TET परीक्षा घेण्यात यावी.
9) केंद्रशासन व राज्यशासन स्तरावर रिक्त पदांवर नवीन नोकर भरती करण्यात यावी, या भरतीत कॉन्ट्रॅक्ट भरती करु नये.
10) देशात समान शिक्षण व्यवस्था लागू करण्यात यावी.
*****
