निमित्त नागपंचमी चं... सहकार्य सामाजिक वनीकरण विभागाचं !
सोलापूर : नागपंचमीच्या निमित्ताने सामाजिक वनीकरण विभागाच्या सहकार्याने इको फ्रेंडली क्लब आणि नाग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्मृती वन उद्यान येथे 'सापांचे विश्व' या विषयावर विशेष जनजागृतीपर कार्यक्रम पार पडला.
सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनाधिकारी लक्ष्मण आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक, वसुंधरा मित्र परशुराम कोकणे यांनी केले, तर वनपाल महेश हिरेमठ यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
या उपक्रमात सर्पतज्ञ राहुल शिंदे यांनी सापांचे निसर्गातील महत्त्व आणि त्यांच्याविषयीच्या रंजक बाबींची माहिती दिली. लहान मुलांसह मोठ्यांनीही अत्यंत कुतूहलाने विचारलेल्या प्रश्नांमुळे सापांविषयीचे अनेक गैरसमज दूर होण्यास मदत झाली. प्रबोधन सत्रानंतर उपस्थितांनी सहकुटुंब वनभोजनाचा आनंद घेतला.
या कार्यक्रमाला नाग फाउंडेशनचे अनिल अलदार, शिवा मुनोळी, सुनील अरळीकट्टी, शंतनू पुंडा, शिव कानकुर्ती, विजय खांडेकर, रवीकुमार आकेन, अजय हिरेमठ, गणेश पवार, आदित्य गायकवाड, करण हगलगुंडे, सम्राट कुमरी तसेच इको फ्रेंडली क्लबचे समन्वयक अजित कोकणे, प्रा. भिमगोंडा पाटील, अंजली अंबीगार, सिद्धेश कल्याणशेट्टी, रोहित बलसुरे, चंद्रकांत जवळकोटे, प्रा. शिवकुमार राऊतराव, योगिता चाबुकस्वार, पद्मकांत घंटे, जय हंचाटे, सनी पाटील, संतोषकुमार तडवळ, डॉ. प्रवीण बिरगे, सरस्वती कोकणे आणि महेश स्वामी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सापांचे प्राण वाचवणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य
चित्रपट आणि टीव्ही मालिकांच्या माध्यमातून सापांविषयी समाजात मोठे गैरसमज निर्माण करण्यात आले आहेत. प्रत्यक्षात साप दूध पीत नाही, तसेच सापाला कान नसल्याने आवाज ऐकू येत नाही.
निसर्गात आढळणारे सगळेच साप विषारी नसतात. त्यामुळे कुठेही साप दिसल्यास घाबरून न जाता किंवा त्याला न मारता त्वरित सर्पमित्रांशी संपर्क साधावा. स्वतःचा बचाव करत सापांचे प्राण वाचवणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे."
- राहुल शिंदे, सर्प अभ्यासक.
****
