मराठीतून तेलुगु शिकविणाऱ्या मोफत अभ्यासक्रमाचा शुभारंभ; 74 जणांचा उत्स्फूर्त सहभाग

shivrajya patra

सोलापूर : पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय, सोलापूर व हृदय स्पर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "मराठीतून तेलुगु लिहायला-वाचायला शिका" या 02 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दर रविवारी सकाळी 9.30 ते 11 वा. या 10 आठवड्यांच्या  मोफत डिजिटल व प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा शुभारंभ रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात झाला. 

उद्घाटन समारंभानंतर तात्काळ पहिल्या वर्गालाही सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत 74 प्रशिक्षणार्थींनी पहिल्याच दिवशी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष देविदास गोटीपामूल होते. 

प्रमुख पाहुण्या म्हणून सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर उपस्थित होत्या. त्यांनी मराठी भाषिकांसाठी मराठीतून तेलुगु शिकविण्याचा अभिनव उपक्रम असल्याचे सांगून आयोजकांचे कौतुक केले आणि भविष्यात आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले.

यावेळी आधुनिक सारथी मासिकाचे संपादक श्रीनिवास बुरा यांनी संस्थेच्या सामाजिक कार्याचे व तेलुगु प्रशिक्षण उपक्रमाचे कौतुक केले. मागील वर्गापेक्षा यंदा अधिक प्रतिसाद मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तेलुगू–मराठी साहित्यिक संस्थाचे संस्थापक अध्यक्ष व कवी नरेंद्र गुंडेली यांनी वाचनालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विविध भाषांतील सुमारे 35 हजार पुस्तकांच्या संग्रहाचे कौतुक करत तेलुगु आणि मराठी भाषेचे महत्त्व स्वलिखित कवितेतून मांडले.

पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाचे कार्यवाह अरविंद चीन्नी यांनी वाचनालयाच्या विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. यावेळी संचालक आनंद वल्लाकट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरीशंकर दिकोंडा यांनी केले, तर गोपीकृष्ण वड्डेपल्ली यांनी आभार मानले.

उद्घाटनानंतर झालेल्या पहिल्या वर्गात प्रशिक्षक काशिनाथ गंजी यांनी तेलुगु भाषेतील 14 स्वर (अच्चुलु) प्रात्यक्षिकासह शिकविले. तसेच तेलुगुतील अभिवादन, परिचय करून देणारी शब्दरचना आणि दैनंदिन वापरातील सोपी वाक्ये शिकविण्यात आली.

अभ्यासक्रमातील सहभागींसाठी विनामूल्य प्रवेश, वही-पेन, डिजिटल अध्ययन साहित्य आणि अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

या उपक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती नर्मदा गंजी, मार्गदर्शक श्रीरंग रेगोटी, तसेच श्रीनिवास वंगारी, उमेश नक्का, बाबुराव म्हेत्रे आणि मोहन सामलेटी यांचे विशेष सहकार्य लाभले.

To Top