तरुणाच्या खूनाचा गुन्हा 24 तासाच्या आत उघडकीस आणण्यास गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश

shivrajya patra

एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी

पूर्वी झालेल्या वादावरुन भांडणास प्रारंभ 

जखमी रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर घटनास्थळावरून आरोपींनी घेतला काढता पाय 

सोलापूर : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरूवारी पहाटे पूर्वी घडलेल्या उमर मौलाली बिराजदार खून प्रकरणाचा गुन्हा 24 तासाच्या आत उघडकीस आणण्यास गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आलंय. तपास पथकानं मन्सुरअली नदाफ आणि त्याच्या 02 मित्र आरोपींना गजाआड केलंय. 

पूर्वी झालेल्या वादातून उद्भवलेल्या भांडणाचं पर्यवसान उमरच्या हत्येत झाल्याची कबुली आरोपींनी दिली. तो धारदार शस्त्रानं वार केल्यावर रक्ताच्या थारोळ्यात निपचीत पडल्यावर घटनास्थळावरून घेतला काढता पाय घेतल्याचं आरोपींनी तपास पथकाला सांगितले.

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नई जिंदगी पाण्याची टाकी इथं गुरुवारी, 06 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12.15 ते सकाळी 09.30 वा. च्या दरम्यान अज्ञाताने, अज्ञात कारणावरून धारधार हत्याराने डोक्यात, गालावर, हातावर वार करुन उमर मौलाली बिराजदार यास जिवे ठार मारल्याची फिर्याद मृताचा भाऊ अबुजर मौलाली बिराजदार यांनं दाखल केली.

त्या फिर्यादीनुसार एम.आय.डी.सी पोलीस ठाण्याकडं भा.न्या.सं. 2023 कलम 103 (1) प्रमाणे खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. रात्रीच्या वेळी तरुणाच्या खूनासारखा गंभीर स्वरुपाचा गुन्हा घडल्याने, घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्रीमती अश्विनी पाटील, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ) प्रितम यावलकर, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) दिलीप पवार, सहा. पोलीस आयुक्त (विभाग-1) अरुण देवकर यांनी पोलीस ठाण्याकडील अधिकारी व अंमलदार यांना गुन्हा उघडकीस आणण्यासंबंधी मार्गदर्शन केले.

पोलीस आयुक्तालय कडील वरिष्ठ पोलीस अधिकारी, वपोनि (गुन्हे शाखा) अरविंद माने व त्यांच्याकडील तपास पथके, पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.एस. बिराजदार, पो.नि. (गुन्हे) श्रीमती. संगीता पाटील, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उप निरीक्षक अल्फाज शेख आणि त्यांच्या पथकातील अंमलदार यांनी गुन्ह्याचे घटनास्थळास भेट दिली. 

घटनास्थळाचे परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेजची पाहणी सुरु केली, दरम्यान गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळविण्याचे काम तात्काळ सुरु केले. पोसई अल्फाज शेख यांना " नई जिंदगी पाण्याचे टाकी येथे उमर बिराजदार यांचा खून केलेले तीन इसम हे अक्कलकोट रोडवरील बी.एस.एन.एल टॉवर जवळील मोकळ्या मैदानात थांबलेले आहेत." अशी गोपनीय माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार, पोसई अल्फाज शेख आणि पथकाने, बी.एस.एन.एल टॉवर जवळ, मल्लीकार्जुन नगर ब्रिजच्या बाजूस असलेल्या सव्हिस रोडवरील फुटपाथजवळ थांबलेल्या तीन संशयीतांना चौकशी कामी ताब्यात घेतले.

त्या तीन संशयीतांना विश्वासात घेऊन, कौशल्याने त्यांच्याकडे विचारपूस केली असता, त्यापैकी मन्सुरअली नदाफ याने सांगितले की, 06 ऑगस्ट रोजी पहाटेच्या वेळेस तो आणि त्याचे मित्र आहद इकबाल सय्यद, अविनाश दशरथ चव्हाण व त्यांचा आणखी एक मित्र उमर मौलाली बिराजदार असे नई जिंदगी पाण्याचे टाकीखाली गप्पा मारत बसले होते, त्यावेळी त्यांच्यात पूर्वी झालेल्या वादावरुन भांडण सुरु झाले. 

तेव्हा मन्सुरअली नदाफ याचे मित्र आहद इकबाल सय्यद, अविनाश दशरथ चव्हाण यांनी उमर बिराजदार यास पकडले, अन् मन्सुर अलीने त्याच्याकडील धारदार शस्त्राने उमर याच्या डोक्यात चार-पाच वार केले, तसेच त्याच्या गालावर व हातावर मारले, उमर जागीच रक्ताच्या थोराळ्यात पडला, असं सांगून तिन्ही आरोपींनी मिळून, त्यांचा मित्र उमर बिराजदार याचा खून केल्याची कबुली दिली. या तिन्ही आरोपींच्या ताब्यात असलेली आणि गुन्हा करण्याकामी वापरलेली 70, 000 रुपये किंमतीची एक हिरो स्प्लेंडर मोटार सायकल जप्त करण्यात आली. 

खूनाचा गंभीर स्वरुपाचा संवदेनशील गुन्हा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अल्फाज शेख आणि त्यांच्या पथकाने, कौशल्य आणि अविरत प्रयत्नाने गुन्हा घडल्यापासून 24 तासाचे आत उघडकीस आणला. खूनाच्या गुन्ह्यात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती संगीता पाटील या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ) प्रितम यावलकर, सहा. पोलीस आयुक्त (विभाग-1) अरुण देवकर तसेच एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. एस. बिराजदार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पोलीस उप निरीक्षक अल्फाज शेख आणि त्यांच्या तपास पथकाने पार पाडली.

चौकट 

... अशी आहेत आरोपींची नावं !

मन्सुरअली महंमद नदाफ (वय- 22 वर्षे, रा. घर नं. 37, सिध्देश्वर गांधी नगर भाग-5 नई जिंदगी, सोलापूर), आहद इकबाल सय्यद (वय- 22 वर्षे, रा. प्लॉट नं. 108, मजरेवाडी, सोलापूर) आणि अविनाश दशरथ चव्हाण (वय - 20 वर्षे रा. घर नं. 04, बापूजी नगर, मजरेवाडी, नई जिंदगी, सोलापूर) 

चौकट 

... यांनी पार पाडली कामगिरी !

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पोलीस उप निरीक्षक अल्फाज शेख, तसेच पोलीस अंमलदार राकेश पाटील, एकनाथ उबाळे, संदीप जावळे, सचिन भांगे, दिलीप विधाते, आमसिध्द निंबाळ, अविनाश शिंदे, अविनाश डिगोळे, सचिन लवटे, सुहास अर्जुन, अमर शिवशिंगवाले, नागेशसिंह चव्हाण, कुमार बोल्ली, सकलेन मुकादम, अमोल खरटमल, राहुल सुरवसे, अय्याज बागलकोटे आणि अर्न गायकवाड यांनी पार पाडली.

To Top