सोलापूर/प्रतिनिधी : 'जनता संघर्ष न्यूज' आयोजित "इयत्ता दहावी-बारावी गुणवंत विद्यार्थी सत्कार व समाजोपयोगी संस्था-संघटनांचा सन्मान सोहळा-2026" हा भव्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. शिक्षण, समाजसेवा व मानवतेचा गौरव करणाऱ्या या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली.
या सोहळ्यात पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, प्राचार्य डॉ. नसीम पठाण, श्री छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे तसेच गिरीजा महिला सहकारी संस्थेच्या अध्यक्षा सौ. शुभांगी दर्गोपाटील यांच्या शुभहस्ते गुणवंत विद्यार्थी, समाजोपयोगी संस्था-संघटना व विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मानचिन्ह (ट्रॉफी) आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वाक्षरीची प्रतिकृती असलेले विशेष पेन देऊन गौरव करण्यात आला. 
कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच दीप प्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर सिद्धार्थ भडकुंबे व लक्ष्मी नागणसुरे यांनी स्वागतगीत सादर करून वातावरण भारावून टाकले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्धार्थ भडकुंबे यांनी केले. उत्कृष्ट सूत्रसंचालिका व निवेदिका नर्मदा कनकी यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले, तर श्रीकांत हाले यांनी आभार प्रदर्शन केले. उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचा शाल, फेटा, गुलाबपुष्प आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वाक्षरीचे विशेष पेन देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून 'जनता संघर्ष न्यूज' च्या या समाजाभिमुख उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. शिक्षणाला प्रोत्साहन देतानाच समाजसेवकांचा सन्मान करणारा हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे सांगत सिद्धार्थ भडकुंबे यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार, पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे, 'सारा न्यूज' चे संपादक डॉ. राम हुंडारे, पत्रकार निलेश डांगे, अमोल कुलकर्णी, नागेश पासकंटी, विजयकुमार जुंजा, गिरमल्ला गुरव, संतोष धोत्रे, सिताराम गायकवाड तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
याच कार्यक्रमात 'जनता संघर्ष न्यूज' चॅनलच्या दक्षिण सोलापूर तालुका प्रतिनिधीपदी द्रौपदी हाले व स्नेहल बशेट्टी यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गायत्री हाले, श्रीकांत हाले, द्रौपदी हाले, स्नेहल बशेट्टी, प्रतीक चिंदरकर आदींनी विशेष परिश्रम घेतले. 
शिक्षण, समाजसेवा आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या 'जनता संघर्ष न्यूज' च्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, हा कार्यक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. उपस्थितांसाठी अल्पोपहार आणि चहापानानं कार्यक्रमाची गोड सांगता झाली.
➡️ सन्मानित संस्था आणि संस्थांचे पदाधिकारी
✨ रॉबिन हूड आर्मी, अक्कलकोट- संस्थापक रशीद किस्तके,
✨ प्रयास फाऊंडेशन, सोलापूर- अध्यक्ष साजन हावळे,
✨ क्रांतिवीर भगतसिंग युवा प्रतिष्ठान- अध्यक्ष दशरथ काळे,
✨ संस्कार संजीवनी फाऊंडेशन, आश्रम हगलूर -परमेश्वर काळे,
✨ रणसम्राट बहुउद्देशीय सामाजिक संस्था, विजापूर रोड- मिलिंद ठोंबरे
✨ एम. जे. प्रथम मानव सेवा संस्था- मोहन तालाकोल्लूल,
✨ एम. के. फाउंडेशन, सोलापूर- संस्थापक महादेव कोगणुरे,
✨ सुचंद्र मागासवर्गीय चॅरिटेबल ट्रस्ट, सोलापूर– संस्थापक शीलरत्न चंद्रकांत गायकवाड
✨ संजीवनी महिला मंडळ, सोलापूर- संस्थापक संजीवनी गायकवाड-पंडागळे,
✨ बी. एस. फाउंडेशन, सोलापूर- संस्थापक अन्सर तांबोळी (बी.एस.सेठ),
✨ मैत्री सोशल फाउंडेशन, सोलापूर- विनायक साळुंके.
➡️ गुणवंत विद्यार्थी व विशेष सन्मान
याप्रसंगी ✨ अनन्या कुलकर्णी, स्वरा पाटील, प्रणव धुमाळ, प्रज्ञा प्रसन्न, वैभवी हिरेमठ, सौरभ बनसोडे, प्रणया साळुंखे, सर्वेश एकबोटे, वैष्णवी वाडकर, अनुष्का ऐवाळे आणि असावरी खारे या गुणवंत विद्यार्थ्यांबरोबरच पॉलिटेक्निक कॉलेज, सोलापूर इथं किरण बंडगर यांची कॅम्पस निवड झाल्याबद्दल, मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल पूजा हर्डीकर तसेच सामाजिक बांधिलकी आणि पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल अशोक सोनकंटले यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
****
