जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन... ! जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलन आणि आरक्षण उपवर्गीकरणविरोधी लढ्यास बहुजन शिक्षक महासंघाचा जाहीर पाठींबा

shivrajya patra

सोलापूर/प्रतिनिधी : नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी, शिक्षण क्षेत्रातील गैरव्यवहार, भ्रष्टाचार आणि विद्यार्थ्यांवरील अन्यायाच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनास तसेच महाराष्ट्रातील आरक्षण उपवर्गीकरणाविरोधातील आंदोलनास महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाने जाहीर पाठींबा दर्शविला आहे. यासंबंधीचं निवेदन शुक्रवारी, जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय पातळीवरील थोर विचारवंत आणि समाजसेवक सोनम वांगचुक हे जंतर-मंतर येथे गेल्या २५ दिवसांपासून आमरण उपोषण करत असून, अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली हजारो विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले आहेत. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस लाठीमाराचा महासंघाने तीव्र निषेध नोंदविला. 

या घटनेची नि:ष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच केंद्र शासनाने विद्यार्थ्यांशी खुली चर्चा करून शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सोडवावेत, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.

याचबरोबर, महाराष्ट्र शासनाच्या आरक्षण उपवर्गीकरण निर्णयाला विरोध करण्यासाठी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनालाही बहुजन महासंघाने पाठिंबा जाहीर केला. 

27,  जुलै रोजी सोलापूर येथे आयोजित मोर्चासही महासंघाचा सक्रिय सहभाग राहणार असून, शासनाने आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

यावेळी महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर, राज्य सरचिटणीस बोधिप्रकाश गायकवाड, उपाध्यक्ष रमेश लोखंडे, जिल्हाध्यक्ष प्रा. युवराज भोसले, जिल्हा सेक्रेटरी रवी देवकर, सहसेक्रेटरी डॉ. राजदत्त रासोलगीकर, राज्य सल्लागार प्रा. डॉ. औदुंबर जाधव, सदस्य प्रा. सचिन वाघमोडे, जिल्हा महिला प्रतिनिधी प्रा. अनुराधा पाटील, संघटक प्रा. विकास काटकर, सदस्य प्रा. सागर शिंदे, प्रा. अभिजीत भंडारे, महेश मेंडके आणि संघटक अविनाश भालशंकर यांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या करून आंदोलनांना जाहीर पाठिंबा दिला.

To Top