स्टिंग एनर्जी ड्रिंकचे घेतले नमुने ! शाळा परिसरात अपायकारक अन्नपदार्थ-कॅफिनयुक्त पेयांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई - मंत्री नरहरी झिरवाळ

shivrajya patra

मुंबई : शाळांच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या आरोग्यास अपायकारक ठरणारे अन्नपदार्थ; तसेच कॅफिनयुक्त पेयांची विक्री आढळून आल्यास संबंधितांवर प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.

स्टिंग एनर्जी ड्रिंकच्या सेवनामुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत सदस्य विक्रम पाचपुते यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री झिरवाळ बोलत होते. यावेळी सदस्य राहुल कुल आणि वरुण सरदेसाई यांनीही उपप्रश्न उपस्थित केले.

मंत्री झिरवाळ म्हणाले की, शाळांच्या आवारात व परिसरात बालकांच्या आरोग्यास अपायकारक अन्नपदार्थ आणि कॅफिनयुक्त पेयांची विक्री होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. 

अशा प्रकारची विक्री आढळल्यास त्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला देण्याबाबत पालक, शिक्षक, मुख्याध्यापक तसेच जिल्हा परिषदांना सूचित करण्यात आले असून संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल.

राज्यात अन्न व औषधांच्या नमुन्यांच्या तपासणीसाठी सध्या छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि मुंबई येथे तीन प्रयोगशाळा कार्यरत आहेत. याशिवाय रायगड, नाशिक, यवतमाळ आणि पुणे येथे नवीन प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार असून सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर आणखी 22 प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे अन्न नमुने तपासणीची प्रक्रिया अधिक वेगवान होईल, असे मंत्री झिरवाळ यांनी सांगितले.

मंत्री झिरवाळ यांनी सांगितले की, एप्रिल 2025 ते मे 2026 या कालावधीत स्टिंग एनर्जी ड्रिंकचे 27 अन्ननमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले असून त्यापैकी 10 नमुने प्रमाणित घोषित करण्यात आले आहेत. तसेच एप्रिल 2025 ते मार्च 2026 या कालावधीत विविध एनर्जी ड्रिंकचे 115 अन्ननमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. त्यापैकी 63 नमुने प्रमाणित, एक नमुना कमी दर्जाचा आणि सहा नमुने मिथ्याछाप घोषित करण्यात आले असून उर्वरित नमुन्यांच्या तपासणीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

***

To Top