भक्तीरसात चिंब झाले बाल वारकरी; एन. के. किड्स स्कूलची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

shivrajya patra

सोलापूर : टाळ-मृदंगाचा गजर, "ज्ञानोबा-तुकाराम" चा अखंड जयघोष आणि विठ्ठल नामात रंगलेले चिमुकले वारकरी... या भक्तिमय वातावरणाने बाळे येथील राजेश्वरी नगरी परिसर शुक्रवारी अक्षरशः पंढरीमय झाला. आषाढी एकादशीनिमित्त एन. के. किड्स स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बालदिंडीने उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेतील पालक राजेंद्र देवघन यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करण्यात आली. त्यानंतर विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव यांसह विविध संतांच्या वेशभूषेत सजलेल्या चिमुकल्यांनी टाळ, भगवे ध्वज आणि तुळशी वृंदावन हातात घेऊन उत्साहात दिंडी काढली. "विठ्ठल... विठ्ठल..."च्या नामघोषाने परिसर दुमदुमून गेला.

या बालदिंडीतून विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची परंपरा, संतांचे विचार, भक्ती, समता आणि संस्कार यांची सुंदर ओळख करून देण्यात आली. चिमुकल्यांच्या निरागस भक्तिभावाने आणि उत्स्फूर्त सहभागाने उपस्थित पालक भावूक झाले. 

अनेकांनी या उपक्रमाचे कौतुक करत, अशा कार्यक्रमांमधून मुलांमध्ये संस्कृतीची बीजे रुजतात, अशी भावना व्यक्त केली. यावेळी राजा आलुरे, विकास कस्तुरे यांच्यासह पालक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका श्वेता कस्तुरे, शिक्षिका पुनम कळसाईत, रोहिणी आदलिंगे, प्राजक्ता भस्मे तसेच सेविका संगीता हेगडकर आणि श्रीमती शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.

चिमुकल्या वारकऱ्यांच्या निरागस भक्तीने आणि विठ्ठल नामाच्या गजराने एन. के. किड्स स्कूलमध्ये अवघी पंढरीच अवतरल्याचा अनुभव उपस्थितांना आला.

***

To Top